पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केरळसाठी मदत करावी

0
738

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – अतिवृष्टीने महापूर आल्यामुळे संपूर्ण केरळ राज्य उद्ध्वस्त झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळला पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप साऊथ इंडियन सेलच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली.

भाजप साऊथ इंडियन सेलचे अध्यक्ष राकेश नायर व शिष्टमंडळाने आयुक्त हर्डीकर यांची मंगळवारी भेट घेऊन केरळसाठी मदतीची मागणी केली. यावेळी सुनील गोपीनाथ, सुमेश पिलाइ, रिजीकुमार, सत्यनाथन प्रसाद आदी उपस्थित होते.

महापुरामुळे केरळवर जलसंकट कोसळले आहे. संपूर्ण राज्य पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेकांचा बळी गेला आहे. या पुराच्या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी केरळला सर्व स्तरातून मदतीची अपेक्षा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन केरळला देण्याचा निर्णय घेऊन केरळवासीयांना थोडा दिलासा दिला आहे. आता महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही केरळसाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी नायर यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली.