पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधीनेते पदासाठी अजित गव्हाणे ?

0
403

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला तोडिस तोड म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार त्या संदर्भातील घोषणा लवकरच करणार आहेत.

महापालिकेत भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. यापुर्वी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांनी विरोधीपक्ष नेतेपदावर काम करताना भाजपला बऱ्यापैकी जेरीस आणले होते. त्यानंतर नाना काटे यांनी संधी मिळाली. काटे यांचे एक वर्ष १ ऑगस्ट रोजी पूर्ण झाल्याने आता नवीन विरोधी नेता नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यास पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना सांगितले होते.

त्यानुसार पाच सदस्यांनी अर्ज केले आहेत. अजित गव्हाणे (भोसरी) यांच्याशिवाय माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (मासुळकर कॉलनी), जेष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर राजू मिसाळ (प्राधिकरण), नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे (दोघेही काळेवाडी) यांनीही या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

महापालिकेत भाजापचे भरभक्कम बहुमत (१२८ पैकी ७८ नगरसेवक) आहे. अपक्षांचेही त्यांना पाठबळ असल्याने विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत आहे. बहुमताच्या जोरावर भाजप मनमानेल असे निर्णय घेत असताना राष्ट्रवादीकडून लटका विरोध होतो. त्यामुळे विरोधी पक्षाची ताकद कमी पडते. तीन वर्षे आमदर लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपाचे शहराध्यक्षपद होते. ते सांगतील तो निर्णय होत होता. आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. भोसरी मतदारसंघातील ९० टक्के नगरसेवक त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे विरोधक म्हणून राष्ट्रवादी खूपच दुबळी पडते आहे. त्यावर तोडगा म्हणून भोसरीतीलच विरोधीपक्षनेता असावा, असा राष्ट्रवादीतील जेष्ठांचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुध्दा त्यासाठी राजी असल्याचे समजले.

नगरसेवक अजित गव्हाणे हे भोसरी मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा निवडून आले. २००७ मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. त्यानंतर त्यांना एकही पद नसल्याने त्यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर विरोधक माजी आमदार विलास लांडे यांचे खंदे समर्थक अशी त्यांची दुसरी ओळख आहे. आमदार लांडगे आणि भाजपाला चाप लावण्याठी गव्हाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, असे समजले.

विरोधी नेते पदासाठी दुसरे प्रबळ दावेदार म्हणून मिसाळ यांच्यासाठी राष्ट्रवादीतील दुसरा गट आग्रही आहे. प्राधिकरणातून सलग तीन टर्म ते नेतृत्व करत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तिसऱ्या क्रमांकावर माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर याचे नाव घेतले जाते. नेहरूनगर- मासुळकर कॉलनी प्रभागातून त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. काळेवाडीतून राष्ट्रवादीला भक्कम पाठबळ असल्याने नढे आणि कोकणे यांनीही या पदासाठी दावा केला आहे.

दरम्यान, विद्यामान विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपल्याला आणखी सहा महिने मुदतवाढ द्यावी यासाठी अजित पवार यांच्याकडे विनंती केली आहे.