पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार

0
1268

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार बुधवारी ( दि.१५  ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे. सकाळी दहाच्या सुमारास आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे. त्यानंतर कंट्रोल रूमला कॉल करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे.

आयुक्तालयाच्या पहिल्या ध्वजारोहणासाठी पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सध्या आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरु आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. आयुक्तालयाची सर्व सूत्रे ऑटो क्लस्टर मधून हलणार आहेत. ऑटो क्लस्टर मध्ये दोन केबिन आणि एक हॉल पालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी दिला आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय असणार आहे. सध्या पुणे शहर आयुक्तालयाचे परिमंडळ तीन पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु आहे. या कार्यालयात पोलीस उप आयुक्त बसणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.