पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत मटका धंदा तेजीत; पत्रकारांपासून ते थेट पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचतो हफ्ता

0
1062

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मटक्याचा धंदा जोमाने सुरु आहे. त्याबाबतची संपूर्ण खबरबात असूनही पोलिस त्याकडे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष करत आहेत. मटक्याच्या धंद्यातून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज २५ कोटींहून अधिक रक्कमेची उलाढाल होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या संबंधित पोलिस शिपायांपासून ते थेट पोलिस आयुक्तांपर्यंत दररोज लाखोंचा हप्ता पोचत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही पत्रकारांनाही महिन्याकाठी हफ्ता पोहोचवून हा अवैध धंदा करणाऱ्यांनी प्रसारमाध्यमांचेही तोंड बंद केले आहे. त्यामुळे सामान्यांनी आता न्याय मागण्यासाठी जायचे कोणाकडे?, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यापासून काही सामाजिक संघटना आयुक्तालय हद्दीत सर्रासपणे सुरु असलेल्या मटका व्यावसायाविरोधात लढा देत आहेत. आवाज उठवत आहेत. पोलिस दखल घेत नसल्याने थेट पोलिस ठाण्यांच्या समोरच काही संघटनांनी आंदोलने केली आहेत. परंतु, कारवाईचे आश्वासन दिलेल्या पोलिसांनी प्रत्यक्षात काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे समाजभल्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. पोलिसांचे पाठबळ असल्याने कोट्यवधींची कमाई करणाऱ्या मटका धंदेवाल्यांना आता पोलिसांची भितीच राहिली नसल्याचे चित्र आहे.

तुम्ही सामान्य नागरिक आहात आणि शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याकडेला नजर फिरवलीत, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा मटक्याचा धंदा तुमच्या सहजच नजरेच पडल. मात्र पोलीसांकडे खबरे, इंटलीजन्स असून सुध्दा त्यांना हा अवैध धंदा दिसत कसा नाही?, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी, सांगवी पोलीस ठाणे हद्दीत सर्रासपणे मटक्याचा धंदा सुरु आहे. त्यातून दररोज २५ कोटींहून अधिक रक्कमेची उलाढाल होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही उलाढाल पोलिसांच्या आशिर्वादानेच सुरू आहे. हा आशिर्वाद राहण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत हप्ते गोळा करणाऱ्या पोलिस शिपायांपासून ते थेट पोलिस आयुक्तांपर्यंतच महिन्याला लाखोंचा हप्ता पोचत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मटका व्यवसायाबाबत माध्यमांमध्ये बातमी छापून येऊ नये यासाठी शहरातील काही ठराविक पत्रकारांनाही महिन्याला हजारोंचा हप्ता पोचविला जात आहे. त्यामुळे पोलिस आणि पत्रकार हफ्ते घेऊन “तेरी भी चुप मेरी भी चुप” म्हणत मटका धंदा करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत. शहरातील या अवैध धंद्याला राजकीय वरदहस्तही आहे. अनेक ठिकाणी राजकारणीच मटका धंदा चालवत असल्याचे चित्र आहे. सध्या शहरात मटका व्यवसाय हायटेक झाला आहे. मटक्याचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळे आणि अॅप आहेत. त्यावर ऑनलाईन बेटींग देखील घेतला जातो. काही प्रसिध्द हिंदी, मराठी भाषिक वृत्तपत्रात तर याचा निकाल देखील छापला जातो.

शहरात हा मटका धंदा चालवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप देखील असल्याचे सांगितले जाते. त्याद्वारे गुपचुप बेटींग घेऊन पैशांची देवाण घेवाण होते. यामुळे पोलिसांच्या सायबर सेलवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. पिंपरीतील एका पोलीस चौकीपासूनच्या हाकेच्या अंतरावरच मटका धंदा सुरु आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी पोलीस आयुक्तालय होऊन काय उपयोग झाला?, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय म्हणजे हफ्ते गोळा करण्याचे नवीन कुरणच बनल्याचे चित्र आहे.