‘पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करा!’

0
393

– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आता ‘पीएमआरडीएम’मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप पवार यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १९७२ साली झाली आहे. शहरातील कष्टकरी, कामगार वर्गाला परवडणाऱ्या दरांमध्ये हक्काचे घर उपलब्ध व्हावे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा हेतू होता.

दरम्यान, पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (पीएमआरडीए) मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वीच प्राधिकरणाच्या हद्दीतील एक-दीड- दोन गुंठा जमीनीवर कामगार-चाकरमानी- कष्टकऱ्यांनी घर उभारले आहे. राज्यातील तसेच अन्य राज्यातीलही कष्टकरी नागरीक या ठिकाणी रहायला आले आहेत. अशा नागरिकांची घरे प्राधिकरण प्रशासनाच्या नियमांनुसार अनधिकृत ठरली आहेत. प्राधिकरणाच्या किचकट अटी-शर्तींमुळे संबंधित गोरगरिब नागरिकांची घरांवर टांगती तलवार आहे.

आता पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (पीएमआरडीए) मध्ये समाविष्ट होत असताना संबंधित सर्वसामान्य नागरिकांची घरे नियमित करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी आमची मागणी आहे.