‘लस कमी व नागरीक जास्त, आता हेल्पलाईन सुरू करा’- मंगला कदम यांची मागणी

0
301

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात दिवसें दिवस कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून कोरोना नियत्रंणासाठी मनपाने कोरोना लसीकरण मोहिम चालू केली आहे. त्यासाठी मनपाच्या सर्व रुग्णालयात, खाजगी रुग्णांलयांमध्ये तसेच स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू केली आहेत, कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे नागरीकांना लसीकरणाचे महत्व समजले. त्यामुळे नागरीक लसीकरणास उत्तम प्रतिसाद देत आहेत.

परंतु मागील चार-पाच दिवसापासून लसीकरण केंद्रावर अपुरा लशीचा पुरवठा होत असल्यामुळे लस कमी व नागरीक जास्त अशी परीस्थिती निर्माण होत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे. नागरीक सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर नागरीकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोना बाधित रुग्ण वाढविण्यास मदत करीत आहेत.

त्यामुळे मनपाने एका लसीकरण केंद्रावर एका दिवसात किती लसीकरण होईल हे एक दिवस अगोदर प्रसिध्द केल्यास लसीकरण केंद्रावर नागरीक गर्दी करणार नाहीत. त्याच प्रमाणे मोठ्या सोसायट्यामध्येही लसीकरण केल्यास गर्दी टाळता येईल व काही अंशी कोरोनास अटकाव करता येईल त्या दृष्टीने सुध्दा प्रयत्न गरजेचे आहे. तसेच कोरोना संदर्भांत मनपाच्या अधिका-यांना फोन केल्यास ते फोन उचलत नाहीत, त्यामुळे कोरोनाबाबत आवश्यक माहिती मिळत नाही. त्यामुळे कोरोनासाठी वेगळी हेल्पलाईन चालू करण्याचाही गरज आहे, अशी सुचना कदम यांनीमहापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.