पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची तोफ धडाडणार

0
2426

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि बहुजनांचे नेतृत्व म्हणून स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २८ जानेवारी रोजी पिंपरीतील एच. ए. मैदानावर जाहीर सभा आणि महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची तोफ धडाडणार आहे.

याबाबत भारिप महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अकिल मुजावर, नाथन केंगार, सुरेश गायकवाड, रहीम सैय्यद, सचिन तराळे आदी उपस्थित होते. पिंपरीतील एच. ए. मैदानावर दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेला आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. किसन चव्हाण, ॲड. अरुण जाधव, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माळी समाजाचे नेते शंकर लिंगे, होलार समाजाचे नेते नाथन केंगार, लिंगायत समाजाचे नेते शिवानंद हैबतपुरे महाराज, धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर, मातंग समाज नेते गणपत भिसे, सचिन बगाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वंचित बहुजन समाज सत्ता परिवर्तन घडवेल, असा विश्वास देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केला.