पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे वाढविण्यासाठी राज ठाकरे स्वतः लक्ष घालणार – बाळा नांदगावकर

0
499

पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळकट करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लक्ष देणार असल्याचे पक्षाचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी (दि. ४) सांगितले.

शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बाळा नांदगावकर यांनी पिंपरीत बैठक घेतली. यावेळी अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र गारूडकर, समीर ठिगळे, शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत नेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष बांधणीसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचे म्हणणे ऐकून घेतले. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या स्थापनेपासून नेत्यांनी पिंपरी-चिंचवडकडे कधीच लक्ष दिले नसल्याची खंत व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक निवडून येऊनही शहरात पक्षवाढ करण्यासाठी नेत्यांनी वेळ दिली नाही. आताही नेत्यांच्या दृष्टीकोनात फारसा फरक पडला नसल्याचे पदाधिकारी म्हणाले.

पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेऊन पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वतः राज ठाकरे हे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालतील, असे सांगितले. तसेच आजपर्यंत पक्षाचे या शहराकडे दुर्लक्ष झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. परंतु, यापुढे असे होणार नाही. मी स्वतः पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून येईन, असा शब्द त्यांनी दिला.