पिंपरी-चिंचवडमधील एका पत्रकाराने भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याकडे मागितली २५ लाखांची खंडणी

0
8329

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील एका वरिष्ठ पत्रकाराने भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला बदनामी करण्याच्या बातम्या देण्याची धमकी देऊन तब्बल २५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला खंडणी मागतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग “पीसीबी”च्या हाती लागले आहे. या खंडणीखोर पत्रकारावर कडक कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर बाबी तपासण्याचे काम सुरू असल्याचे भाजपच्या या माजी पदाधिकाऱ्याने “पीसीबी”शी बोलताना सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. खंडणी मागणारा हा वरिष्ठ पत्रकार मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्याने यापूर्वी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी, बिल्डर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले आहे. या वरिष्ठ पत्रकाराने आपल्या गावी खंडणीच्या पैशांतून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केल्याचे समजते.

खंडणी मागणारा हा वरिष्ठ पत्रकार पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रचंड खपाचे एकमेव निःपक्ष व निर्भिड दैनिकाचा पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा प्रमुख असल्याचे समजते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना हा वरिष्ठ पत्रकार प्रचंड निर्ढावला होता. राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या खंडणीखोर पत्रकाराला अभय दिले होते. त्याच्या जोरावर तो अनेक वरिष्ठ अधिकारी, महापालिकेतील पुढारी आणि पोलिसांनाही ब्लॅकमेल करत होता. पैसे न दिल्यास या सर्वांना बदनामीच्या बातम्या किंवा त्यांचे पितळ उघडे पाडण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे हे सर्वजण गपगुमान पैसे देऊन आपली बदनामी होण्यापासून बचाव करत होते. त्यामुळे हा वरिष्ठ पत्रकार निर्ढावला आहे.

अधिकारी, पुढारी आणि पोलिसांना ब्लॅकमेल करून या वरिष्ठ पत्रकाराने अमाप माया गोळा केली. परंतु, २०१७ मध्ये महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर या खंडणीखोर पत्रकाराची दुकानदारी बंद झाली. महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना भीक न घातल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्यातून त्याने एक चूक केली आणि ती आता त्याला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खंडणीखोर वरिष्ठ पत्रकाराने भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला तो काम करत असलेल्या दैनिकात बदनामीच्या बातम्या छापण्याची धमकी दिली. तसेच २५ लाख रुपये दिल्यास बदनामीच्या बातम्या छापणार नसल्याचे सांगितले.

त्याने भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला भेटून २५ लाखांची मागणी केली. त्याचे खंडणी मागण्याचे हे सर्व कारनामे भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने गुप्त कॅमेऱ्याद्वारे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले आहे. हे व्हीडिओ रेकॉर्डिंग “पीसीबी”च्या हाती लागले आहे. यासंदर्भात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला विचारले असता एका वरिष्ठ पत्रकाराने बदनामीच्या बातम्या न छापण्याच्या मोबदल्यात २५ लाख रुपये मागितले. त्याचा व्हीडिओ खरे असल्याचे सांगितले. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेत असून, संबंधित पत्रकारावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. खंडणीखोर पत्रकाराच्या या कारनाम्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याकडे खंडणी मागणारा हा पत्रकार मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजते. तो गेल्या कित्येक वर्षापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारितेत आहे. सध्या तो एका पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित दैनिकात पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा प्रमुख म्हणून वावरत आहे. पत्रकारितेपेक्षा खंडणी मागणे, पोलिसांकडून हप्ते घेण्यासाठी हा पत्रकार बदनाम आहे. मद्यपान करून वाहन चालविताना या खंडणीखोर पत्रकार महाशयाचा दोन-तीन वेळा अपघातही झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खंडणीखोर पत्रकाराने पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. हा पत्रकार संघाचा अध्यक्ष असताना सहकारी पत्रकारांच्या नावानेही त्याने अनेकांकडून खंडणी वसूल केल्याचे उघड गुपित आहे.

त्याबाबत शहरातील पत्रकारही मूग गिळून गप्प राहणे पसंत करतात. शहराच्या राजकीय वर्तुळात हा खंडणीखोर पत्रकार प्रचंड बदनाम आहे. त्याने शहरातील प्रत्येक राजकीय नेत्याकडून खंडणी वसूल केल्याचे बोलले जाते. त्याबाबत हे राजकीय नेते खासगीत बोलताना या पत्रकाराविरोधात प्रचंड रोष व्यक्त करतात. परंतु, त्याबाबत उघडपणे बोलायला कोणीही समोर येत नाही. या खंडणीखोर पत्रकाराने ब्लॅकमेल आणि खंडणीद्वारे मिळवलेल्या पैशातून आपल्या मूळ गावी सीबीएसई बोर्डाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केल्याचे समजते. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही मोठी मालमत्ता निर्माण केल्याचे समजते. खंडणीतून मिळालेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी या खंडणीखोर पत्रकाराने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आहे. अशा या खंडणीखोर पत्रकारामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रामाणिक पत्रकारांवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.