पिंपरी कॅम्प बाजारपेठ गुरुवारपर्यंत पुन्हा बंद

0
501

पिंपरी, दि.24 (पीसीबी): पिंपरी कॅम्प बाजारपेठीतील दुकानदार , ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पिंपरी बाजारपेठ आजपासून दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेने दिली आहे.

पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ, शगुन चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या परिसरातील बाजारपेठ आजपासून 25 जून 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, असा आदेश महापालिका ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.

सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमत आहेत. सामाजिक अंतराचे पालन होत नाही. फेसमास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखांनुसार दुकाने सुरु ठेवण्याच्या निमयाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

साई चौक, बौद्ध नगर, भाटनगर, रमाबाई नगर, आंबेडकर नगर, नानेकर चाळ, वैष्णव देवी मंदिर परिसर आदी भागात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प व परिसर बंद ठेवण्यात आला आहे.