पिंपरीत सव्वाशे झाडे पडली, वाहनांचे मोठे नुकसान

0
409

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. या दरम्यान तब्बल १२५ झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंगळवार आणि बुधवार अशा दोन्ही दिवसात अनेक झाडं मुळासह उन्मळून पडली होती. अनेक ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या घटनांमध्ये कोणतीही जीविहितहानी झाली नाही. अशा संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपले कर्तव्य बजावत पडलेली झाडे बाजुला केली.

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तासंह निसर्गाचंही मोठं नुकसानं झालं. शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण, भोसरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरीगाव, वाल्हेकरवाडी यासह इतर भागात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी पावसाला सुरुवात झाली. त्या अगोदर मान्सूनपूर्व वाटणारा पाऊस हा निसर्ग चक्रीवादळाची चाहूल असल्याचं समजलं. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा याचा मोठा फटका बसणार असल्याचे भाकीत हवामान विभागानं वर्तवलं होतं. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याचे हे भाकीत तंतोतंत खरेही ठरले.