सोलापूरात धर्माच्या भिंती कोसळल्या, कुलकर्णी काकुंवर मुस्लिम समुदायाकडून अंत्यसंस्कार

0
578

सोलापूर, दि. ४ (पीसीबी) – कोरोनाच्या काळात माणुसकी संपली नाही तर धर्माच्या भिंती पाडून नव्या जोमाने उभी राहिली आहे. भेदभावाच्या भिंती कोसळत आहेत. सोलापुरात कुलकर्णी काकूंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम समुदाय धावून आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहरातील नई जिंदगी चौकाचा परिवार बहुसंख्य गोरगरीब व मध्यमवर्गीय मुस्लिम समुदायाने वेढलेला. याच भागात पद्मावती कुलकर्णी (वय ८५) राहायच्या. त्यांचे चारही मुलं पुणे, बंगळुरू, अहमदाबाद, विजापूर अशा विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. इकडे वृध्द कुलकर्णी काकूंच्या घरी त्यांच्या सोबत जावई आणि नातू राहतात. वृध्दापकाळाने कुलकर्णी काकूंचे गुरूवारी पहाटे राहत्या घरीच निधन झाले. शहरात नातेवाईक विखुरले आहेत.
परंतू, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे नातेवाईक येऊ शकत नव्हते. एव्हाना, कुलकर्णी काकूंच्या चारही मुलांनी आईच्या अंत्यविधीसाठी येऊ शकत नसल्याचे कळविले. तेव्हा जावयाने आपल्या एका भावाला कसेबसे बोलावून घेतले. तरीही तीन माणसांनी मिळून अंत्यविधी कसा उरकायचा, असा प्रश्न पडला. कुलकर्णी काकूंचे शेजार-पाजारच्या मंडळींशी संबंध होते. तेव्हा ही मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धावून आली असता अंत्यविधी उरकरण्यासाठी मनुष्यबळाची असलेली अडचण सर्वाच्या लक्षात आली.
त्यानंतर तेथील नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री यांनीही तेथे धाव घेतली. हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यविधीची व्यवस्था करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित २५ मुस्लीम बांधवांनी अंत्ययात्रेत सहभागी होत कुलकर्णी काकूंच्या पार्थिवाला आलटून-पालटून खांदा दिला. नंतर एका शववाहिकेतून कुलकर्णी काकूंचे पार्थिव, मजरेवाडीतील हिंदू स्मशानभूमीत नेऊन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
———————