पिंपरीत पादचाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक; ९० हजारांचा ऐवज जप्त

0
726

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघा जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये सहा मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण ९० हजारांचा ऐवज पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.

सोमनाथ बाळासाहेब लबडे (वय २०, रा. भोसरी), हृषीकेश शिवाजी मोहिते (वय २०, रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर गार्डन जवळ, भोसरी), गौरेश गिरीश नाईक (वय २०, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मोबाईल फोन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होता आहे. या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे एक पथक काम करत होते. या पथकाला पिंपरी पोलीस ठाण्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सोमनाथ लबडे हा भोसरी येथे असल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमनाथ याला भोसरी येथून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हृषीकेश आणि गौरेश यांच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे कबूली दिली. पोलिसांनी हृषीकेश आणि गौरेश या दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या तिघा आरोपींकडून चोरीचे सहा मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी संतोष बर्गे, महादेव धनगर, हेमंत खरात, सुरेंद्र आढाव, प्रमोद लांडे, कैलास बोबडे, प्रमोद हिरळकर यांच्या पथकाने केली.