पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात ग्रंथालय सुरु करा; ओबीसी संघर्ष समितीची मागणी

0
863

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरीतील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यावर मेघडंबरी आणि हार घालण्यासाठी कायमस्वरुपी आरसीसी जीना बांधण्यात यावा तसेच सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये अद्ययावत बहुउपयोगी ग्रंथालय उभारावे अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट आदी उपस्थित होते. ३ जानेवारी २०१८ रोजी सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, अद्यापही या ठिकाणी ठरल्याप्रमाणे स्पर्धापरिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिटीश लायब्ररी’ प्रमाणे ग्रंथालय उभारलेले नाही. त्याची चालू आर्थिक वर्षात अंमलबजावणी होऊन पुर्ण क्षमतेने ग्रंथालय उभारण्यात यावे.

तसेच, नियोजीत अभ्यासिकेत महापुरुषांची तैलचित्रे, फोटो लावावेत. शिवाय हॉलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान घेण्यासाठी आसन व्यवस्था, चित्रफित दाखविण्याची व्यवस्था करावी. या स्मारकात सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा उभारावा. शहराच्या नावलौकिकात भर घालेल असे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक ठरावे. अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. २८ नोव्हेंबरला महात्मा फुले यांचा स्मृतीदिन आहे. त्यावेळी हजारों अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे महापौर व आयुक्तांनी याबाबत ताबडतोब कारवाई करावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.