पासवान कन्येने दंड थोपटले; वडिलांविरोधात लोकसभा लढवणार

0
1182

पाटना, दि. १४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांना विरोधकांकडून नव्हे तर त्यांच्या घरातूनच आव्हान निर्माण झाले आहे. पासवान यांची कन्या आशा पासवान यांनी वडिलांविरोधात दंड थोपटले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने तिकीट दिल्यास वडिलांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे आशा यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी चर्चा करताना आशा पासवान यांनी हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी आशा यांनी रामविलास पासवान यांच्यावर दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. त्यांनी नेहमीच माझा भाऊ चिराग याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. कारण ते नेहमीच मुलींसोबत भेदभाव करतात, असा आरोप आशा यांनी केला.

चिरागला पक्षाचा संसदीय अध्यक्ष केल्यानंतर मी काहीच बोलले नव्हते. परंतु, आता जर मला आरजेडी हाजीपूरमधून लोकसभेचं तिकीट देत असेल तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असंही त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे आशाच नव्हे तर आशाचे पती आणि पासवान यांचे जावई अनिल साधू यांनीही हाजीपूरमध्ये सासऱ्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आशा किंवा मला दोघांपैकी आरजेडीने कुणालाही तिकीट दिले तरी आम्ही निवडणूक लढवू, असे साधू यांनी सांगितले.