पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विकासकामांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0
535

पुणे, दि. ७ (पीसीबी) –  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या तसेच पुण्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या मंत्री काळातील निर्णयाबरोबरोच राजकीय जीवनावर दृष्टीक्षेप टाकणारे, पुण्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उहापोह करणारे ‘ बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे ’ या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर येथे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माजी पत्रकार व कन्टेंट कन्सेप्ट कम्युनिकेशन्सचे संचालक सुनील माने या पुस्तकाचे संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची माहिती लोकांना झाली पाहिजे हे आपले कर्तव्य समजून बापट त्यांच्या कामाचा अहवाल प्रतिवर्षी प्रकाशित करतात. याच धर्तीवर मंत्री म्हणून बापट यांच्या चार वर्षात घेतलेल्या निर्णयाच्या अहवालाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री व गडकरींच्या हस्ते करण्यात आले.

अहवाला सोबतच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसंघाचा एक कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री अशी गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द उलगडणारे ‘बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे’ हे पुस्तक ही या वेळी प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे वैशिष्ठ म्हणजे आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात बापट यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आणि त्याचा सर्वसामान्य माणसाला होत असलेला फायदा यावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.

यातील काही ठळक नमूद करण्याजोगी कार्ये म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी ही व्यवस्था संगणकीकृत केली. रेशनवर मिळणारे धान्य योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी ‘ई – पॉस’ मशीन आणले, सार्वजनिक वितरण प्रणालीमधील भ्रष्टाचार व काळाबाजार संपवण्यासाठी द्वारपोहोच योजना,रेशन दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन, साठवणूक क्षमतेत वाढ करण्यासाठी अनेक गोडावून बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

तसेच शेतकऱ्याला लाभ मिळावा म्हणून विकेंद्रित धान्य खरेदी योजना सुरु केली. भेसळ रोखण्यासाठी त्यांनी कायद्यात बदल करून कठोर शिक्षेचे प्रावधान केले. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्टेंट तसेच इतर वैद्यकीय उपकरणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणली. हाफकिनचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित असावा यासाठी त्यांच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केल्या.

ग्राहक संरक्षक मंत्री म्हणूनही त्यांनी ग्राहकाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे, लोकांच्या समस्येला सभागृहातून न्याय मिळावा यासाठी संसदीय कार्यमंत्री म्हणून नेहमीच त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विधिमंडळाचे कामकाज खासगी वाहिन्यांसाठी उपलब्ध करून देऊन सभागृहातील कामकाजात आणखी पारदर्शकता आणली.

पुण्याच्या विकासासाठी आमदार म्हणून ते नेहमी सभागृहात आवाज उठवत होते. मात्र विरोधात असल्याने त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरत होते. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री या नात्याने त्यांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. पुण्याचा विकास आराखडा, पीएमआरडीएची स्थापना,रिंग रोड, पुण्याच्या वाहतूक समस्येवर उपाय योजना म्हणून पुणे मेट्रोचा निर्णय , हिंजवडी आयटी नगरीच्या समस्या सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे रुंदीकरण तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा निर्णय, म्हाळुंगे – माण टाउनशिप, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, नदीचे पाणी सुधारण्यासाठी जायका प्रकल्प, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, इंद्रायणी नदीसुधार योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बहुमजली उड्डाणपूल, राष्ट्रीय स्मारक म्हणून भिडे वाड्याचे संवर्धन,या व यासारख्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे निर्णय व त्याची सुरवात, त्यामागील पार्श्वभूमी, या बाबत सुरु झालेले काम, भविष्यकालीन पुण्यासाठी घेतलेले निर्णय या सर्व विषयांची छायाचित्रांसह पार्श्वभूमी या पुस्तकात देण्यात आली आहे.