प्राधिकरणातील गर्भश्रीमंत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलकडून विजेचा गैरवापर; महावितरणचे ५० लाखांहून अधिक रक्कमेचे नुकसान

0
845

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या “ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल” या गर्भश्रीमंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेने वीजेचा गैरवापर करून महावितरणचे सुमारे ५० लाखांहून अधिक रक्कमेचे नुकसान केले आहे. शाळेच्या बांधकामासाठी वाणिज्यिक (कमर्शियल) वीजमीटरऐवजी घरगुती वीजमीटरद्वारे विजेचा वापर करण्यात आला आहे. २०१४ पासून म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन ही चोरी केल्याचे समजते. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन वर्षाला कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या शाळेने सरळसरळ वीजेचा गैरवापर करून महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याने ही शाळा विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देत असेल?, याबाबत त्यांच्या पालकांनी चिंता करण्यासारखी स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत “ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल” ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वार्षिक शुल्कांव्यतिरिक्त लाखो रुपयांचे डोनेशन वसूल केले जाते. नर्सरीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासूनच ही डोनेशन वसुली होते. त्यातून या शाळेला वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे ही शाळा परिसरात गर्भश्रीमंत म्हणून ओळखली जाते. परंतु, गर्भश्रीमंत असलेल्या या शाळेने लाखो रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले आहे.

या शाळेने २०१४ मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केले . त्यासाठी वाणिज्यिक (कमर्शियल) वाजमीटरचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, शाळेने चोरी छुपे घरगुती वीजमीटरवरूनच विजेचा वापर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून अशा प्रकारे विजेचा गैरवापर होत होता. त्यातून महावितरणचे ५० लाखांहून अधिक रक्कमेचे नुकसान झाले आहे. ही बाब एका जागरूक नागरिकाला समजल्यानंतर त्याने त्याबाबत आक्षेप नोंदवला. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने गेल्या महिन्यात केवळ नावाला वाणिज्यिक वीजमीटर जोडून घेतले आहे.

या शाळेच्या इमारतीचे अद्यापही बांधकाम सुरूच आहे. त्यासाठी वाणिज्यिकऐवजी घरगुती वीजमीटरवरूनच विजेचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. शाळेने वीजेचा गैरवापर करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हातशी धरले होते. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या चिरीमिरीमुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याच संस्थेच्या लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे ५० लाखांहून अधिक रक्कमेच्या या वीजगैरवापरात शाळेच्या व्यवस्थापनांसह महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी आहेत, हे स्पष्ट होते.

यासंदर्भात शाळेचे विकास व्यवस्थापक शाहनवाज पठाण यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष झोडगे यांच्याशी संपर्क साधला असता “ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल” या शाळेने बांधकामांसाठी वाणिज्यिक वीजमीटरचा वापर केला नसल्यास त्याची माहिती घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सामान्याने वीजबिल न भरल्यास मुदतीच्या दुसऱ्याच दिवशी वीजमीटर तोडणारे महावितरणचे प्रशासन गेल्या चार वर्षांपासून झोपा काढत होते, हे स्पष्ट झाले.