पार्थ पवार यांचा मोठा निर्णय लवकरच, राज्यातील आघाडी सरकरावर टांगती तलवार

0
429

मुंबई,  दि. १४ (पीसीबी) : शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत. पार्थ पवार हे लवकरच मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत. दरम्यान, भाजपचे काही नेते अजित पवार यांच्या संपर्कात असल्याने गूढ वाढले आहे. 

पार्थ पवार यांच्या या भूमिकेमुळे पवार कुटुंबियांमध्ये अद्याप काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. या वादावरुन काल रात्रीही शरद पवारांच्या मुंबईतल्या घरी बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. पण या बैठकीनंतरही विषय मिटलेला नाही. या प्रकरणावर अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मौन बाळगलं आहे.

पार्थ पवार यांचा मोठा निर्णय काय असणार? पार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? पार्थ दुसऱ्या पक्षात जाणार का राजकारणापासून अलिप्त राहणार? पार्थ पवार यांच्या निर्णयामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. तसंच पार्थ पवार यांनी मोठा निर्णय घ्यायचं ठरवलं तर अजित पवार काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पवार कुटुंबासाठी मात्र हा मोठा धक्का असणार आहे. या राजकीय घडामोडीत आघाडी सरकारसुध्दा पडू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.