पार्किंगवरून वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

0
561

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – वाहने पार्क करण्यावरून वाद होऊन मारहाण करून रोकड व सोनसाखळी चोरून नेली. चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 8) ही घटना घडली. दरोडा व जबरी चोरी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी परस्पर विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचवड येथील 33 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका मॉल मालकाच्या दोन मुलांसह मुलीवर व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या जागेत एका मॉलचे ग्राहक त्यांची वाहने पार्क करीत होते. याबाबत फिर्यादी हे मॉलच्या मालकाला जाब विचारण्यास गेले. त्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोणीतरी लोखंडी जड वस्तू फिर्यादीच्या डोक्यात मारली. तसेच फिर्यादीच्या खिशातील चार हजार 500 रुपयांची रोकड व एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. दरोड्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडित 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिल्यानुसाार पोलिसांनी 33 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मॉलमध्ये होत्या. त्यावेळी आरोपीच्या मालकीच्या जागेत मॉलच्या ग्राहकांनी वाहने का पार्क केली, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेच्या भावाला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नका, असे फिर्यादीने आरोपीला सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी बळजबरीने ओढून चोरून नेली. तसेच फिर्यादीच्या दोन भावांनी प्रतिकार केला असता, त्यांना धक्काबुक्की करून आरोपी निघून गेला. जबरी चोरी तसेच विनयभं प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.