फार्मसिस्ट महिलेच्या छळ प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

0
487

वाकड, दि. ११ (पीसीबी) – फार्मासिस्ट असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोथरुड येथे 2 डिसेंबर 2019 ते 6 फेब्रुवारी 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.

पीडित 25 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी शनिवारी (दि. 9) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अक्षय अनिल ढगे (वय 32), सासू भारती अनिल ढगे (वय 54), सासरे अनिल मारुती ढगे (वय 57), दीर शुभम अनिल ढगे (वय 26, सर्व रा. कोथरुड, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या फार्मासिस्ट आहेत. फिर्यादी या सासरी नांदत असताना पती, सासू, सासरे, दीर यांनी संगणमत करून फिर्यादीला माहेरहून दहा तोळे सोने व सोन्याच्या बांगड्या घेऊन येण्यास सांगितले. त्याला विवाहितेने नकार दिला असता सासूने घालून पाडून बोलून शिवीगाळ केली. तुझ्या वडिलांना सांग तुला मेडिकल टाकून द्यायला, असे बोलून पतीने मानसिक त्रास दिला.

फिर्यादी बाथरूमवरून आल्यानंतर सासूने त्यांना अंघोळ करण्याची जबरदस्ती केली. त्याला विवाहितेने नकार दिला. ‘तू मला उलट का बोलली’, असे म्हणून सासूने फिर्यादीला शिवीगाळ केली. सासू व दिराने फिर्यादीच्या पतीला फिर्यादीबाबत उलटसुलट सांगून त्यांच्या विरोधात भडकावून दिले. त्यांचे ऐकून पतीने फिर्यादीला शिवीगाळ केली.

‘तू तुझ्या आईवडिलांच्या घरी निघून जा, मला तुझी गरज नाही’, असे बाेलून पतीने फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाबद्दल फिर्यादीने सासऱ्यांना सांगितले. ‘तुला काही अक्कल नाही, तुला घरातील गोष्टींचे अजिबात नॉलेज नाही’, असे बालून सासऱ्याने फिर्यादीला गप्प केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.