बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त

0
358

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघांना मोशी येथून अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास हवालदार वस्ती मोशी येथे करण्यात आली.

गौरव मच्छिन्द्र डोंगरे (वय 23, रा. बलुत आळी, चाकण), शंकर शिवाजी वाडेकर (वय 30, रा. भांबोली, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुधीर डोळस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार वस्ती मोशी येथे चौधरी ढाब्याजवळ दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून गौरव आणि शंकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 80 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.

आरोपींच्या विरोधात आर्म ऍक्ट 3 (25), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.