‘पाकिस्तानवाली गली’ चे नाव बदला; रहिवाशांची पंतप्रधानांकडे विनंती

0
382

लखनऊ, दि. ३१ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोयडा येथील ‘पाकिस्तानवाली गली’ या वसाहतीच्या रहिवाशांनी वसाहतीचे नाव बदलण्याची विनंती केली आहे. वसाहतीच्या नावामुळे शासनाने पुरविलेल्या मुलभूत सुविधांचाही लाभ घेता येत नाही असे येथील नागरीकांचे म्हणणे आहे. परिणामी, येथील रहिवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे वसाहतीचे नाव बदलण्याची विनंती केली आहे.

‘देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानातून आलेले काही लोक येथे स्थायीक झाले, त्यानंतर या परिसराला ‘पाकिस्तान वाली गली’ असे नाव पडले. पण आमचे पूर्वज पाकिस्तानातून आले त्यामध्ये आमची चूक नाहीये. आम्ही भारतीय आहोत. आमचे केवळ चार पूर्वज पाकिस्तानातून आले होते. पण अद्यापही आमच्या आधार कार्डवर पाकिस्तानवाली गली असे लिहिले आहे. आम्ही या देशाचाच एक भाग आहोत, तर मग पाकिस्तानच्या नावाखाली आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न का होतो’, अशी खंत येथील एका रहिवाशाने व्यक्त केली. तर, ‘आधार कार्ड दाखवून देखील आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतोय पण भविष्यात त्यांनाही नोकऱ्या मिळणार नाहीत. काय करायचे हा विचार सारखा मनात येत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वसाहतीचे नाव बदलावे आणि आम्हाला नोकऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात’ अशी मागणी येथील रहिवासी भूपेश कुमार यांनी केली आहे.

आम्ही दुसऱ्या देशातून आल्याप्रमाणे येथील नागरीक आमच्याशी वाईट वागतात, आम्हाला मोदींकडून अपेक्षा आहेत. त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला तर ते नक्कीच काहीतरी पावले उचलतील अशी अपेक्षा अन्य एका नागरीकाने व्यक्त केली. या वसाहतीत ६० ते ७० घरे असून सरकारने त्यांच्या वसाहतीचे नाव बदलावे अशी त्यांनी विनंती केली आहे.