पाकने दहशतवादविरोधी कायमस्वरुपी कारवाई करावी- अमेरिका

0
646

वॉशिंग्टन, दि. ८ (पीसीबी) – पाकिस्तानने देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरू केली असली, तरी अमेरिका मात्र पाकिस्तानच्या या कारवाईबाबत पूर्णत: समाधानी नाही. पाकमधील दहशतवादी कारवायांविरोधात पाकिस्तानने कायमस्वरूपी आणि सततची कारवाई करण्याची गरज आहे, असे आवाहन अमेरिकेने पाकिस्तानला केले आहे. पाकिस्तानने ‘जमात-उद-दावा’ या संघटनेचे मुख्यालय ताब्यात घेत अनेक मदरशांवर कारवाई केल्यानंतर अमेरिकेने हे आवाहन केले आहे. 

पाकिस्तानातील प्रतिबंध लावण्यात आलेल्या संघटनांच्या एकूण १२१ सदस्यांना नजरकैदेत टाकण्यात आल्याचे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान दहशतवादाविरोधात उचलत असलेल्या पावलांवर अमेरिकेचे लक्ष असून, भविष्यात दहशतवादी हल्ले होणार नाहीत आणि संपूर्ण क्षेत्रात स्थैर्य प्राप्त होईल अशा दृष्टीने पाकिस्तानने कायमस्वरुपी कारवाई करावी असे आवाहन आम्ही पाकिस्तानला केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिनो यांनी म्हटले आहे.