जागतिक महिला दिनानिमित्त मराठी महिला व्यंगचित्रकारांना सलाम!

0
757

महिला आज विविध क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. साहित्‍य क्षेत्रातील विनोद प्रांतही त्‍याला अपवाद नाही. तथापि, व्‍यंगचित्र किंवा अर्कचित्र या प्रांतात व्‍यंगचित्रकारांची त्‍यातही महिला व्‍यंगचित्रकारांची संख्‍या खूप कमी आहे. मराठी भाषेत बोटावर मोजता येतील इतक्‍या महिला व्‍यंगचित्रकार आहेत, पण म्‍हणून त्‍यांचे महत्‍त्‍व कमी होत नाही. त्‍यांनी आपल्‍या परीने या कलेची सेवा केलेली आहे, करीत आहेत.

डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, शरयू फरकंडे, राधा गावडे, कल्पना नान्नजकर या मराठी भाषेतील महत्‍त्‍वाच्‍या महिला व्‍यंगचित्रकार आहेत. अश्विनी मेनन, शुभा खांडेकर या इंग्रजी भाषेत कार्यरत आहेत. महिलांना विनोदाचे, व्‍यंगचित्रांचे  वावडे असते, असे उपहासाने म्‍हटल्‍या जाते. या सर्वांनी मात्र हा शिक्‍का व्‍यंगचित्रांच्‍या बाबतीत नक्‍कीच पुसून टाकला आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्‍यांनी आपली व्‍यंगचित्रकलेची आवड जोपासली आहे. महिलांमध्‍ये विशेषत: विद्यार्थिनींमध्‍ये  व्‍यंगचित्रकलेची आवड निर्माण व्‍हावी, यासाठी ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाइन’ या व्‍यंगचित्रकारांच्‍या संघटनेमार्फतही  विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.

डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर-

यांचा जन्म पुण्याचा. पंचविशीपर्यंतचा टप्पा  पश्चिम महाराष्‍ट्रात पुणे-अहमदनगर येथील आणि त्‍यानंतरचा प्रवास मराठवाडयातील नांदेड येथील.वडील प्राध्‍यापक.  वडिलांकडून कलाप्रेम, संगीत आणि रेषा व आईकडून भाषा असा वारसा प्राप्‍त झाला. लग्‍नानंतर 1984 मध्ये नेत्रतज्ञ म्हणून नांदेडला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. मुले जराशी  मोठी  झाल्यावर  लेखन  सुरु केले.  प्रासंगिक, वैद्यकीय, पुस्तक समीक्षा,  ललित अशा प्रकारचे लेखन महाराष्ट्र टाइम्स,  लोकसत्तासारख्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले. नांदेडच्‍या ‘दैनिक प्रजावाणी’ मध्ये पहिले व्‍यंगचित्र प्रसिध्‍द झाले. त्‍यानंतर  शतायुषी, मिळून सा-या जणी, मोहिनी, यक्ष,  कमांडर अशा अनेक दिवाळी अंकांमधून व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.

व्यंगचित्र म्हणजे रेषांमधून बोलणारे साहित्य. एखाद्या घटनेतील विसंगती हेरुन ती रेषांमधून व्यक्‍त   करण्‍यासाठी त्या घटनेचा वेगवेगळ्या कोनातून विचार आवश्यक. ‘कुठल्याही गोष्टीची दुसरी-तिसरी  बाजू ‘टेक इट इझी’ या भूमिकेतून बघण्याची वृत्ती ही जगण्याचे गणित सोपे करुन टाकते’ हीच  वृत्ती  जोपासत डॉ. पाटोदेकर यांनी  विडंबन काव्ये  रचली,  सादर  केली.  ई टीव्ही मराठीच्या ‘हास्य दरबार’   कार्यक्रमात, लोकसत्‍ताच्‍या ‘हास्‍यरंग’पुरवणीमध्‍ये आणि विविध कवी संमेलनात विडंबनकार म्हणून  रसिकांची  दाद मिळविली. गीतलेखन व घोषवाक्‍य स्‍पर्धांमध्‍ये पारितोषिकेही मिळवली. ‘भेट कांगारुंची स्‍मरते’ हे प्रवासवर्णनपर पुस्‍तक तसेच यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठाच्‍या रुग्‍ण सहायक अभ्‍यासक्रमासाठी  पुस्‍तक लेखन केले. नांदेडच्‍या इंडियन मेडीकल असोसिएशनचे मुखपत्र असलेल्‍या  ‘इमेज’चे संपादनही केले.

शरयू फरकंडे –

यांचा जन्म 9  आक्‍टोबर 1962 मध्‍ये नांदेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणही नांदेड येथेच झाले. आजोबा शिक्षक, वडील सरकारी सेवेत तरआई गृहिणी. घरात चित्रकलेचा वारसा नसतांनाही त्‍यांनी हा छंद जोपासला. त्‍यांचे शिक्षण एटीडी, एम.ए. बी.एड, बीएफए (प्रथम वर्ष) इतके झाले आहे. ग्राफीक डिझायनर म्‍हणून त्‍यांनी  काम केले आहे. तसेच चित्रकला शिक्षक, हिंदीच्‍या प्राध्‍यापक म्‍हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सेवानिवृत्‍तीनंतर शरयू फरकंडे यांनी अर्कचित्रांची आवड जोपासली आहे. यूट्यूबवरील व्हिडीओ आणि या विषयावरील पुस्‍तकांचे वाचन करुन त्‍यांनी आपली कला विकसित केली, हे विशेष. अर्कचित्र क्षेत्रातील क्षितीज अलंकार पुरस्‍कारानेही त्‍यांना गौरवण्‍यात आले आहे. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे अशा ठिकाणी झालेल्‍या व्‍यंगचित्र संमेलनात त्‍यांनी सहभाग घेतलेला आहे. त्‍यांची वैयक्तिक प्रदर्शनेही झाली असून त्‍यांना उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्‍ये ‘शेड्स ऑफ डान्‍स’ या शीर्षकांतर्गत चित्रांतून नृत्‍यशैली हे नावीन्‍यपूर्ण प्रदर्शन झाले. राजस्‍थानी, गुजराथी, आदिवासी, मणिपुरी अशा विविध लोककला आणि तेथील नृत्‍यप्रकार यांचा कलाविष्‍कार फरकंडे यांनी विविध रंगछटा वापरुन साकारला. वेगवेगळ्या भागातील नृत्‍यशैली, त्‍यातील नर्तकींचे भावविश्‍व आणि त्‍यांची वैशिष्‍ट्ये या प्रदर्शनात पहावयास मिळाली. ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’, ‘तुमचे व्‍यंगचित्र तुमच्‍यासमोर’, ‘फर्स्‍ट एक्‍सप्रेशन’अशा विविध उपक्रमांत त्‍यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.  शरयू फरकंडे सध्‍या पुण्‍यात स्‍थायिक झाल्‍या आहेत.

सौ. राधा गावडे –

यांचा जन्म 29 सप्‍टेंबर 1970 चा असून शिक्षण बी.एफ.ए,व डीप. इ.एड इतके झाले आहे. त्‍या सध्‍या वसईला स्‍थायिक झाल्‍या आहेत. राधा गावडे यांनी 1995 पासून व्‍यंगचित्र रेखाटण्‍यास सुरुवात केली. विदूषक, सुगंध, चौफेर साक्षीदार, स्‍नेहदा, साप्‍ताहिक गावकरी, ढिश्‍यांव-ढिश्‍यांव, बहिणा, लिलाई या सारख्‍या विविध दिवाळी अंकांमध्‍ये व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द झाली आहेत. अॅनिमेशन क्षेत्रात यूटीव्‍ही, झी टीव्‍ही  या स्टुडीओमध्ये बरीच वर्ष काम केल्यानंतर आता वसई येथील वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयात अप्‍लाइड आर्टच्‍या विभाग प्रमुख म्‍हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वसई येथील नरवीर चिमाजी या वृत्‍तपत्रासाठी वसईच्या समस्यांवर आधारित  व्‍यंगचित्रे काढलेली आहेत. 1998 मध्‍ये हिंदुस्‍थान टाइम्‍सने घेतलेल्‍या व्‍यंगचित्र स्‍पर्धेत त्‍यांना पारितोषिक मिळाले आहे.तसेच 1999 मध्‍येही श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्‍या हस्‍ते व्‍यंगचित्राचे पारितोषिक मिळाले आहे. कमर्शियल आर्टीस्‍ट म्‍हणून काम केलेले असल्‍यामुळे राधा गावडे यांच्‍या व्‍यंगचित्रांना एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्राप्‍त झालेले दिसते. सामाजिक विषयांवरची त्‍यांची व्‍यंगचित्रे खूपच लोकप्रिय आहेत. व्यंगचित्रांव्यतिरिक्त लहान मुलांच्या कथाचित्रांची कामेही त्या करतात तसेच या विषयावर कार्यशाळाही घेतात.

राजेंद्र सरग (पुणे जिल्हा माहिती अधिकारी यांचा हा लेख)