पहिल्यांदाच भारताचे ‘हे’ चार नौकानयनपटू ऑलिंपिकसाठी पात्र

0
379

नवी दिल्ली, दि.१० (पीसीबी) : भारताच्या क्रीडा इतिहासात आज नौकायनपटूंनी (sailors) आपली नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिली. एकाच वेळी भारताचे चार नौकायनपटू टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. नेत्रा कुमानन ही पहिली भारतीय महिला नौकायनपटू मंगळवारी ऑलिंपिकसाी पात्र ठरल्यानंतर आज विष्णू सर्वानन आणि गणपती चेंगप्पा-वरुण ठक्कर यांनी ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली.

सध्या ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरीत त्यांनी ही कामगिरी केली. आतापर्यंत सुरवातीच्या ऑलिंपिक (olympic)स्पर्धेत केवळ एका प्रकारात भारतीय खेळाडू पात्र ठरायचा. त्यानंतर चार स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू पात्र ठरले. या वेळी मात्र एकाचवेळी चार नौकानयनपटूंनी आपली पात्रता सिद्ध केली. खेळाडूंच्या या कामिगरीने एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. आता तीन प्रकारात भारताचे चार नौकानयनपटू ऑलिंपिकमध्ये सहभागी होतील. सर्वाधिक प्रकारासाठी सर्वाधिक खेळाडू पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे भारतीय याटिंग संघटनेचे संयुक्त सचिव कॅप्टन जितेंद्र दीक्षित यांनी सांगितले. केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनीही ट्विटरवरून भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

आज सर्वप्रथम सर्वानन लेसर स्टॅंडर्ड क्लास शर्यतीत एकूणात दुसरा क्रमांक मिळवून ऑलिंपिकसाठी पात्र ठरला. त्यानंतर चेंगप्पा आणि ठक्कर जोडीने ४९ आर क्लास प्रकारात अव्वल क्रमांकासह पात्रता मिळविली.
ऑलिंपिक पात्रता मिळविणारी भारताची जोडी गणपती चेंगप्पा आणि वरुण ठक्कर

शर्यतीत बुधवारपर्यंत सर्वानन तिसऱ्या क्रमांकावर होता. पण, पदकाच्या शर्यतीत गुरवारी त्याने कमालीच्या नियंत्रणाने प्रवास करताना ५३ गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. त्याने थायलंडच्या किर्ती बुआलोंग (५७ गुण) याला मागे टाकले. सिंगापूरचा रायन लो जुन हान (३१ गुण) हा प्रथम आला. बुधवारपर्यंत सर्वानन आणि थायलंडचा खेळाडू यांचे गुण सारखे होते. पण, आज पदकाच्या दिवशी सर्वानन याने प्रथम शर्यत पूर्ण केली आणि त्यामुळे त्याला बाजी मारता आली, असेही दीक्षित यांनी सांगितले.

ऑलिंपिकसाठी पात्र होणारी पहिली महिला नौकायन खेळाडू ठरलेली नेत्रा कुमानन ही पदकाच्या शर्यतीत सहावी आली. मात्र, सर्वांगिण गुण तालिकेत ती ३० गुणांसह दुसरी आल्याने ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरली. नेदरलॅंडसची इम्मा सॅव्हेलॉन (२९) ही पहिली आली. पदकाच्या शर्यतीत ती चौथी आली होती. पण, तिचा आशियाई पात्रता फेरीसाठी अपात्र धरण्यात आले. हॉंग कॉंगची स्टेफनी नॉर्टन तिसऱ्या क्रमांकासह ऑलिंपिक पात्र ठरली.

यापूर्वी चार वेळा भारताचे दोन नौकानयनपटू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले होते. पण, चारही वेळी ते एकाच प्रकारात पात्र ठरले होते. या वेळी चार खेळाडू तीन प्रकारासाठी पात्र ठरले आहेत. फारुख तारापोर आणि ध्रुव भंडारी १९८४ , तर तारोपार आणि केली राव जोडी १९८८ ऑलिंपिकसाठी ४७० क्लास प्रकारासाठी पात्र ठरली होती. त्यानंतर तारापोर सायरस कामाच्या साथीत १९९२ मध्ये ऑलिंपिकसाठी तिसऱ्यांदा पात्र ठरले. त्यानंतर मानव श्रॉफ आणि सुमीत पटेल ४९ एर क्लास गटात २००४च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरले होते.