“पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा”

0
393

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापताना दिसत आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्याला राजकीय रंग सुद्धा मिळताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून झालेल्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. त्यावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

निलेश राणे म्हणाले कि, “अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात, त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा,” असा टोला निलेश राणे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

दरम्यान, पुण्यात अजित पवार यांनी काल (६ जून) रोजी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पहाटेचा शपथविधी आणि मराठा आरक्षणावर भूमिका मांडली होती. “जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले आहेत. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता करोनाकडे लक्ष देणं आता महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यपाल यांना भेटलो, वरिष्ठांना देखील भेटणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे ग्राह्य धरलं, त्यानुसार साकल्याने विचार करू. सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि सदस्यांची मतं घेत असून, आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र काही जण काहीही स्टेटमेंट करत आहेत. टिकवता आलं नाही असं म्हणत आहेत. हेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं असतं, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं तसं केलं होतं. असले धंदे आहेत याचा त्यामुळे मला राग येतो.”