पवना धरणातून 1400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

0
239

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पाच-सहा दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात 95.80 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून धरणातून 1400 क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावातील रहिवाशांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांना पाणी पुरवठा होणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी (दि. 11) सायंकाळ सहा वाजेपर्यंत धरण 95.80 टक्के भरले आहे. सद्यःस्थितीत धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पाऊस वाढल्यास पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागण्याची शक्‍यता गृहित धरून पाटबंधारे विभागाने विद्युत निर्मिती गृहाद्वारे 1400 क्‍युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवाचे प्रमाण पाहुन रात्री 10 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे 2000 क्‍युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीच्या काठच्या गावांमधील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. तसेच नदी पात्रात व लगत असलेली सर्व साधन सामुग्री व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी केले आहे.