परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ! एलएलबी तृतीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चुकल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ

0
107

पुणे, दि. १७ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ सुरूच असून, बुधवारी (दि. १५) एलएल.बी तृतीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न चुकल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गाेंधळ उडाल्याचे दिसून आले. एलएल.बी तृतीय सत्राच्या ‘प्राॅपर्टी लाॅ ॲण्ड इसमेंट’ या विषयाची ८० गुणांची परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित विविध विधि महाविद्यालयांत पार पडली.

प्रश्नपत्रिकेत पार्ट अ मध्ये दिलेल्या पाच प्रश्नांपैकी ३ प्रश्न साेडविणे अनिवार्य हाेते. त्यातील प्रश्न क्रमांक ३ ‘व्हाॅट आर द लायबलेटीज ऑफ अ माॅरगेझ इन पझेशन ॲण्ड व्हाॅट आर द रेमिडिज व्हेन ही फेल टू गेट पझेशन?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. परंतु माॅरगेझच्या जागी माॅरगेझर अथवा माॅरगेझी असणे अपेक्षित हाेते. त्यामुळे माॅरगेझ या शब्दाच्या काही जबाबदाऱ्या हाेऊच शकत नाहीत.

प्रश्न वाचल्यानंतर विद्यार्थी गाेंधळात पडले. अनेकांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवातही केली. तसेच चुकीचा प्रश्न साेडविण्यामध्ये अनेकांचा वेळ वाया गेला असल्याचे परीक्षार्थी विद्यार्थ्याने सांगितले. दरम्यान, प्रश्नपत्रिकेत चुका हाेऊ नये याची परीक्षा विभागाने दक्षता घ्यावी तसेच चूक झाल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर यांनी केली.