पत्नीच्या फसवणूक, मारहाण प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

0
656

दिघी, दि. ६ (पीसीबी) – पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेतला दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीच्या नावे दोन बँकांमधून कर्ज घेतले. तसेच दुसऱ्या पत्नीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. तिचा सोन्याचा नेकलेस परत न करता त्याचा अपहार केला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विष्णू वामन ठाकरे (वय 52) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी दुसऱ्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 जुलै 2020 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पाथरूट, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता फिर्यादी सोबत विवाह केला. फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने फिर्यादी आणि त्यांच्या आईला अकोला मध्यवर्ती बँक आणि अकोला अर्बन बँकेतून दोन लाख 30 हजार रुपये कर्ज काढण्यास भाग पाडले. ती रक्कम पतीने स्वतःकडे घेतली. ते पैसे परत न करता फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण करून घरातून निघून जाण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा घेतलेला दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस परत न करता अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी माहेरी आल्यानंतर याबाबत तक्रार दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.