….पण जीन्स पँटचं चुकीचं झालं – अजित पवार

0
266

मुंबई,दि.१४(पीसीबी) – सरकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स घालू नये, असे ड्रेस कोडसंदर्भातील नियम राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ते जीन्स पँटचं चुकीचं झालं, पण आम्ही त्याबद्दल अधिक विचार करत आहोत’ असं अजित पवार म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ‘सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण कपडे घालून यावे, ही सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच मंत्रालयात टीशर्ट घालून येत नाहीत. घरी असताना टीशर्ट घातल्यास ठीक आहे. पण जीन्स पँटचं चुकीचं झालं. आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत’ असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार आता सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहेत. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आहे. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.