पगार मिळत नसल्याने एच.ए. कंपनीतील कामगाराची थेरगावात आत्महत्या

0
1700

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – गेल्या वीस महिन्यांपासून पगार न झाल्याच्या नैराश्यातून हिंदूस्थान अॅंटीबायोटिक (एच.ए) कंपनीतील एका कामगाराने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थेरगांव, मंगलनगर येथे घडली.

रामदास शिवाजीराव उकिरडे (वय.५१ रा.मंगलनगर,थेरगांव) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास उकिरडे हे एच.ए कंपनीत लॅबमध्ये काम करत होते. गेल्या २० महिन्यापासून पगार न झाल्याने ते नैराश्यात होते. कंपनीतून घरी आल्यावर ते पगाराबाबत पत्नी आणि मुलांसमोर चर्चा करत होते. त्यांची पत्नीही घरामध्ये ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून घरखर्च चालवत होती. तरीही ते कायम नैराश्यात होते.  त्यांच्या मुलांनीही हा वाईट काळ निघून जाईल, असे सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता.

अखेर त्यांनी शुक्रवारी घरी कोणी नसताना साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.