पंतप्रधान होण्याची संधी असेल, तर लोकसभा लढवणार – मायावती

0
398

लखनौ, दि. ६ (पीसीबी) – मला पंतप्रधान होण्याची संधी  असेल, तर मी उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवेन, असे सुचक विधान बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख  मायावती यांनी केले आहे. पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत त्यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 

देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मायावतींचा पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरला आहे, परंतु मायावती स्वतः निवडणूक लढवत नाहीत. परंतु जर पंतप्रधानपद मिळवण्याची संधी मिळाली,  तर मायावती यांनी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे, तसेच त्यांनी मतदारसंघदेखील निवडला आहे.

बसपातर्फे आंबेडकर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत मायावती म्हणाल्या की, दिल्लीतील राजकारणाचा रस्ता हा आंबेडकर नगरमधून जातो. जर मला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली,  तर मी याच मतदार संघातून लोकसभा  निवडणूक  लढवेल, असे मायावती यांनी म्हटले आहे.