पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट

0
216

पुणे, दि. २८ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या लस निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबद्दल माहिती घेतली. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस बनवली जाते आहे त्या प्लांटला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सीरम इन्स्टिट्यूट भेटीचा कार्यक्रम एक तास सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोजक्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली. “स्वदेशी कोविड लसीबद्दल हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधा केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. लसीसंदर्भात आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांची टीम या कार्यात वेगाने प्रगती व्हावी यासाठी आयसीएमआर बरोबर काम करत आहेत.”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.