पंढरपुरात अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याच्या हस्ते मानाची पूजा तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

0
774

पंढरपूर, दि, १२ (पीसीबी) – आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वारकऱ्यांमधून लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना महापुजेचा मान मिळाला आहे.  .

अनंत रुपाचे सार | अनंत तीर्थाचे माहेर | अनंती अपार तो हा | कटी कर ठेवूनी उभा ||

अनंत तीर्थींचे माहेर असलेल्या पंढपुरात अठ्ठावीस युगांपासून कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असलेल्या सावळ्या विठूरायाच्या पालख्यांसमेवत हरिनामाचा जागर करीत १० लाखांची वैष्णांची मांदियाळी गुरुवारी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेच्या वाळवंटाला जणू वैष्णावांचा महापूर असल्याचे चित्र पाहयळा मिळत आहे.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठूमाउलीची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली. तर लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पूजेला बसण्याचा मान मिळाला. चव्हाण दांपत्य हे गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करत आहेत.

रात्री सव्वादोन वाजता या महापूजेला सुरवात झाली तर पहाटे ३ वाजता विठूरायाची महापूजा संपन्न झाली. विठूमाऊलीच्या मूर्तीला पंचांमृताने स्नान घालून चंदनाचा लेप लावून महापूजा केली तसेच तुळशीच्या हारांनी मूर्तींना सजवण्यात आले. महापुजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजेचा मान मिळालेल्या चव्हाण दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. तर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपस्थित आमदार खासदार, मंत्री यांचे सत्कार करण्यात आले. महापूजा संपन्न होताच राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील दुष्काळ दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातले.