पंडित दिनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्विट डिलीट केल्याने वेगळीच चर्चा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात नेमके दडलयं काय?

0
245

पुणे,दि.२५(पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात भाजप बद्दलचे प्रेम आजही कायम असल्याने त्यांच्या मनात नेमके काय घोळते आहे याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पण, काही वेळानंतर अजितदादांनी ते ट्वीट डिलीट केले. ट्वीट नेमके डिलीट का केले, याची चर्चा रंगली आहे.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज (शुक्रवारी) जयंती आहे. त्यानिमित्त भाजपच्या नेत्यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपाध्याय यांना ट्वीटरद्वारे अभिवादन केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून यापूर्वी अजित पवार यांनी रा.स्व.संघ अथवा भाजपच्या महापुरुषांबद्दल अशी भुमिका घेतलेली नाही. त्यांचे चिरंजीव पार्थ यांचेही भाजप प्रेम सर्वश्रुत असल्याने नवीन राजकीय समिकरणाची चर्चा रंगली आहे.

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! असे अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे अजितदादांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट का केले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपशी सलगी राखून असल्याचे बोलले जात होते. त्यातच त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडून वेळोवेळी भाजपला अनुकूल अशी घेतली जाणारी भूमिका चर्चेचा विषय होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आघाडी सरकराच्या विरोधात जाऊन पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तसेच राम मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर जय श्री राम चे ट्विट केल्याने ते चर्चेत होते. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या चिरंजीवाच्या मनात काय घोळते आहे याबाबत शंका उपस्थित केली जाते आहे.

आता अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट करणे आणि त्यांनतर काही वेळाने ते डिलीट केले. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून चर्चेला उधाण आले आहे. महाआघाडी सरकार मध्ये स्वतः अजित पवार यांची भूमिका अगदी संदिग्ध असते. कोणत्याही निर्णयात कायम पुढे असणारे अजितदादा मागे असतात. भाजपचे नेते, खासदार-आमदार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध तसेच भाजपमधून त्यांच्याबाबतची विधाने यामुळे आगामी काळात नवीन राजकीय समिकरणे निर्माण होऊ शकतात, असेही सांगण्यात येते.