नोकरी नाही, तरीही पत्नीला पोटगी द्या- उच्च न्यायालय

0
453

चंदीगढ, दि. ३१ (पीसीबी) – नोकरी नसल्याने पत्नीला दिल्या जाणाऱ्या पोटगीतून सूट मिळावी ही याचिका पंजाब उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पतीला नोकरी असो किंवा नसो, पतीने पत्नीला पोटगी द्यायलाच हवी, असे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्या पतीला दिले आहेत. नोकरी नाही म्हणून पत्नीला पोटगी देऊ शकत नाही, हे ठोस कारण होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

हरयाणातील रोहतकमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ही याचिका पंजाब उच्च न्यायालयात दाखल केली होती. पत्नीसोबतच्या वैवाहिक संबंधावरून रोहतकच्या फॅमिली कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. पत्नीला दरमहा ६ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली न्यायालयाने पतीला दिले होते. परंतु, काही दिवसांनंतर त्या व्यक्तीची नोकरी गेली. नोकरी नाही, असे सांगत त्या व्यक्तीने वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पत्नीला दिल्या जाणाऱ्या पोटगीतून सूट मिळावी अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. फॅमिली न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवण्याचे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले आहेत.

तुम्ही सुशिक्षित आहात. आज ना उद्या तुम्हाला नोकरी मिळेल. परंतु, तुमच्या पत्नीजवळ उदारनिर्वाह करण्यासाठी कोणतेही साधन नाही. पत्नीला घर खर्च आणि छोट्या मुलीचे पालनपोषण सुद्धा करायचे आहे. त्यामुळे तिला पोटगी मिळणे गरजेचे आहे, असे नमूद करीत पत्नीला दिली जाणारी पोटगीची रक्कम कायम ठेवा, असे सांगत त्या व्यक्तीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, पत्नीच्या वकिलाने पोटगी वाढवण्याची मागणी केली आहे. पोटगी म्हणून जे सहा हजार रुपये मिळतात ते घराच्या भाड्यापोटी जातात, असेही महिलेच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.