“नेत्यांच्या पोरांनी कसेही वागायला हा काय बिहार आहे का ?” – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
2499

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेने दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहर पुरते हादरले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी तानाजी पवार यालाही अटक केली. तपासात दुसरी बाजू समोर आली आणि सारा खेळ पलटी झाला. आमदारा बनसोडे यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी त्यांचा पवार याच्यात काय संवाद झाला याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाली. आमदारांनी पवार याला केलेली दमबाजी आणि दुसऱ्या क्लिपमधील आमदार समर्थकाने पवार यांना धमकावताना केलेला अत्यंत अश्लिल भाषेतील संवाद मती गूंग करणारा आहे. एक दिवस अगोदर आमदारांचे समर्थन करणाऱ्या २०-२५ गुंडांच्या टोळक्याने कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन लोखंडी रॉड ने केलेली मारहाण सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आणि ती व्हिडीओ क्लिपसुध्दा गावभर फिरली. पोलिसांनी या गुन्ह्यात आमदार बनसोडे यांचे पुत्र सिध्दार्थ याच्यासह १५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. तीन वेगवेगळ्या घटना पाहिल्यावर आपण बिहारमध्ये राहतो की काय, असा भास होतो. आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला हे निश्चितच निंदनीय कृत्य आहे. गोळीबाराची घटना हासुध्दा निव्वळ बनाव होता, असा संशय पोलिसांना आहे. तानाजी पवार यांना रक्तबंबाळ करणाऱ्यांत आमदार पुत्र स्वतः पुढे होते, हे आणखी गंभीर.

आपले वडिल कोणी खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक किंवा एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणून आपण काहिही करू शकतो, ही मस्ती आजकाल अनेक नेत्यांच्या दिवट्या मुलांमध्ये आहे. आमदार बनसोडे यांचा चिरंजीव त्यात सापडला इतकेच, असे न सापडलेले शेकडो टपोरी आज शहरात दिसतील. उद्या हेच टपोरी नगरसेवक होऊन शहर खाईत लोटणार म्हणून चिंता वाटते. राजकारणातील गुन्हागारीचा ओनामा असाच होतो, तो वेळीच रोखला पाहिजे, ठेचला पाहिजे. आपले पिताश्रीं वार्डचे लोकप्रतिनिधी म्हणजे जणू कोणी मालकच, असा जो काही समज नेत्यांच्या मुलांमध्ये आहे तो समाजासाठी घातक आहे.

बेताल वागण्याचा जणू परवाना असल्यासारखेच ही पिढी वागते, बोलते. आपण कोणावरही हात टाकू शकतो, कार्यालयात बोलावून डोकं फोडू शकतो असली घमेंड कामाची नाही. पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण बकाल होत गेले, त्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. अण्णासाहेब मगर, शरद पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, डॉ. श्री. श्री. घारे यांच्या नंतर एकही नाव घ्यावा असा स्वच्छ, निस्वार्थी नेता या शहराला मिळाला नाही. ५० वर्षांत घसरगुंडी इतकी झाली की, आता ३०-४० टक्के गुन्हागारी प्रवृतीचे जनप्रतिनिधी निवडूण येतात. तेच त्यांच्या मनाप्रमाणे सत्तेचा गाडा हाकतात. सत्ता हवी तर गुंडांची मदत पाहिजे असते, मग संघाचे राजकीय अंग असलेला भाजपासुध्दा त्याला अपवाद राहिला नाही. आता तर तोच निकष झाला की काय अशी शंका येते. मॅन, मनी, मसल पॉवर ज्याच्याकडे तोच नेता होतो. लोकही दहशतीमुळे त्यांना सलमा करतात. अशा दळभद्री लोकशाहीचे नव्हे गुंडाशाहीचे प्रतिक म्हणजे परवाच्या आमदार गोळीबाराच्या घटनेकडे आणि हाणामारीकडे पाहावे लागेल. याचा अर्थ सर्व संपले असाही नाही. काही सुसंस्कृत राजकीय नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आहेत. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी खासदार गजानन बाबर ही दोन नावे वाणगीदाखल घेता येतील. आजही ते अजातशत्रू आहेत, कारण त्यांनी सर्वसमावेशक असे समाजाकारण म्हणून राजकारण केले. बहुसंख्या स्थानिक नेत्यांची मुले विदेशात शिकलेली, व्यावसायात पारंगत, बदलत्या जगाकडे वेगळ्या नजरेतून पाहणारी आहे. या शहराच्या जडणघडणीबद्दल त्यांच्याही खूप चांगल्या कल्पना आहेत. खरे तर, या पुढच्या पिढीने आणि अशा समविचारी मंडळींनी शहरात राजकीय स्वच्छतेची मोहिम हाती घेतली पाहिजे. तीन वेळा वेगवेगळ्या वार्ड मधून नगरसेवक, दोन वेळा आमदार झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या राजबिंड्या मुलाचे नाव गुन्हागारीच्या यादीत येते, हे खटकले. हे मुलाचे नाही तर बनसोडे यांचेही अपयश आहे. साध्या पानटपरी पासूनचा आमदार बनसोडे यांचा प्रवास खरे तर संपूर्ण शहराचे नेते असा विशाल असायला पाहिजे होता. मुलाचे प्रताप पाहिल्यावर भविष्य काय असेल हे सांगायची गरज नाही. पुढाऱ्यांच्या पोरांना सर्व गुन्हा माफ नसतात, असा संस्कार करण्यात आमदार बनसोडे कमी पडले म्हणून आज ही वेळ आली. त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पाच वर्षे लोकसेवेच्या माध्यमातून प्रतिमा निर्माण केली म्हणून राम शिंदे सारख्या भाजपा मंत्रीमंडळातील दमदार मंत्र्याचा ते पराभव करू शकले आणि राज्यात नावाजले. त्यांनी शरद पवार यांचा खांदा नाही वापरला अथवा शरद पवार यांनीही कधी टेकू दिला नाही. दुसरीकडे पार्थ पवार एकदम आकाशातून टपकले म्हणून अजित पवार यांचे सुपूत्र असूनही मावळ लोकसभेला आपटले. आता पार्थ पवार यांचा मार्ग निवडायचा की रोहीत पवार यांचा ते ज्याचे त्याने ठरवायचे. हे शहर अजित दादांवर प्रेम करते याचा अर्थ ते पार्थ अथवा अण्णा बनसोडे यांच्या सिध्दार्थवर अंधळे प्रेम करेल, असा जर का समज असेल तर तो प्रथम दूर करा. लोक आता बोलत नाहीत करून दाखवतात. आमदार बनसोडे यांचा मुलगा नगरसेवकपदासाठी इच्छुक आहे, पण तो अशा हाणामारीच्या वाटेने जात असेल तर स्वतः वडिल म्हणून बनसोडे यांनी त्याचा कान धरला पाहिजे. उलटपक्षी त्यांनी जर का त्याचे समर्थनच केले तर त्याचे फळसुध्दा कटू असेल. तुम्ही जे पेरता तेच उगवते, हा सृष्टीचा नियम आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भूमिका रास्त –
दोन कामगार कामावर घ्यावेत म्हणून विनंती केली होती, असा आमदार बनसोडे यांचा युक्तीवादसुध्दा तकलादू वाटतो. महापालिकेच्या ठेकेदाराशी आपली ओळख नाही, तो काळा की गोरा हेसुध्दा मला माहित नाही, असे ते सांगतात. प्रश्न असा आहे की, दोन कामगार कामावर घेण्याच्या विषयातून प्रकरण थेट गोळीबारा पर्यंत जाऊ शकते का, असा प्रश्न खुद्द पोलिसांना पडला आहे. आमदारांचे प्रकरण म्हणून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जातीने लक्ष घातले. तपासात सगळे उलटेच प्रकरण असल्याचे आढळल्यावर बाजी पलटली. राज्यातील बड्या नेत्यांनी फोन करून दबाव टाकला होता, त्यानंतरही न बधता पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आमदार बनसोडे यांच्या मुलावर मारहाणीच्या दोन्ही घटनांची शहानिशी करून खुनाच्या प्रयत्नाचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले, हे महत्वाचे वाटते. राज्यात आघाडीचे सरकार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार त्याशिवाय गृहमंत्रीसुध्दा राष्ट्रवादीचे आहेत. असे सर्व राजकीय वजन असतानासुध्दा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी न्याय्य भूमिका बजावली. इथे सामान्य माणसाला न्याय मिळतो, नेता असो वा आमदार, खासदार. जो कोणी चूक असेल त्याला शासन होणारच, हा पोलिस आयुक्तांचा खाक्या आजच्या पोलिसांवरचा विश्वास वाढविणारा आहे. मांडवली बहादर पोलिसांचीसुध्दा खैर नाही. शहर आज पोलिस आयुक्तांवर फिदा आहे, कारण हे एक प्रकरण नाही तर, गेल्या सहा महिन्यांत एकूण एक गुंड, मवाल्यांच्या मुस्क्या त्यांनी वळल्या. काळे धंदे कऱणाऱ्यांची दुकाने बंद केली. कोरोना काळात लूटमार कऱणाऱ्या चार डॉक्टरांनासुध्दा त्यांनी कोठडीत टाकले. अमर मुलचंदानी सारख्या सेवा विकास सहकारी बँकेच्या बादशाह असणाऱ्या नेत्याला गजाआड केले. शहराचे राजकारण, समाजकारण स्वच्छ करायचे असेल तर ते होऊ शकते. पोलिस आयुक्तांच्या `सदरक्षणाय खल निग्रहणाय` या ब्रिद वाक्यामुळे पोलिसांनाही पोलिस असल्याचे आयुष्याभराचे समाधान लाभेल, सार्थक होईल. आमदार बनसोडे या प्रसंगातून शिकतील अशी अपक्षा करू या.