नितीश कुमार चौथ्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री

0
289

पटना, दि. १५ (पीसीबी) – जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी पार पडणार असून यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. 69 वर्षांचे नितीश कुमार उद्या सकाळी ११.३० वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चव्हाण नितीश कुमार यांना शपथ देतील.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगलं होतं. यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचंही म्हटलं होतं. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला.

सलग तीन वेळा मुख्यमंत्रिपद भुषवल्यानंतर अँटीइन्कमबन्सीचा फटका नितीश कुमार यांना बसला. मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही फरक पडला नाही. निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या शब्दाच्याआधारे नितीश कुमार सोमवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. नितीश कुमार यांच्याबरोबर काही मंत्री देखील शपथ घेतील. बिहारमध्ये भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काही महत्त्वाचे नेते आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काही नेत्यांमध्ये चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी जरी विराजमान झाले तरी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेडीयूच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे.