खासदार संजय राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

0
468

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : शिवसेना खासदार  संजय राऊत यांच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरवर्षी 15 नोव्हेंबरला राऊत यांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत: चा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“शिवसेनेचा आवाज प्रखरपणे सामनाच्या अग्रलेखातून मांडणारे, आपल्या वाग्बाणांनी, तर कधी एखाद्या उर्दू पंक्तीतून समोरच्याच्या वर्मावर बोट ठेवणारे संपादक, खासदार आणि मुख्यतः दिलखुलास व्यक्तिमत्व संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे ट्वीट काँग्रेस नेते राजीव सातव यांनी केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी “राजकीय ऊर्ध्वदृष्टी प्राप्त असलेले व राजकीय कुरुक्षेत्रातील कुत्सित विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे ट्वीट केले आहे.

या व्यक्तिरिक्त खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मंत्री धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनीही संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या आहेत.