निगडी ओटास्किम येथे महिलेच्या घरातून साडेतीन लाखांचा गांजा जप्त

0
541

निगडी, दि. २८ (पीसीबी) – घरातून गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदाराला साडेतीन लाखांच्या १६ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली.

मंटु चंद्रभुषन पासवान (वय ४६, रा. आझाद चौक, स्मशान भुमीजवळ, मुळ रा. बंदवा ता. तरारी जि. रजनी, बिहार) आणि सोनाबाई पवार (रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी, पेरुची बाग, सेक्टर क्र.२२) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्किम येथील एका घरातून गांजा विक्री सुरु असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी गुरुवार (दि.२७) साडेसातच्या सुमारास सोनाबाई यांच्या घरात धाड टाकली असता त्या घरामध्ये तब्बल ३ लाख ४५ हजार ४५० रुपये किमतीचा १६ किलो ४५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी मंटु आणि सोनाबाई या दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तपास करत आहेत.