हिरोंच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले ३० सिनेमे – मल्लिका शेरावत

0
539

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे मी एक दोन नाही तर तब्बल ३० चित्रपट गमावले असल्याचा सनसनाटी आरोप अभिनेत्री मल्लिका शेरावतने केला आहे. ज्या अभिनेत्यांसोबत मला भूमिका देण्यात आली ते मी ती भूमिका करते आहे हे पचवू शकले नाहीत. त्याचमुळे त्यांनी या गोष्टीत ढवळाढवळ करून मला रिप्लेस करत स्वतःच्या गर्लफ्रेंड्सना त्या भूमिकेत आणलं असंही मल्लिका शेरावतने म्हटले आहे.

मल्लिकाला घेऊ नका, ती खूप बडबडते. मल्लिका अनेक मतप्रदर्शन करते असं सांगत मला भूमिका नाकारण्यात आल्या असेही मल्लिका शेरावतने म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. आता मागे वळून पाहताना मला वाटते की ते लोक मूर्ख आहेत असेही  मल्लिकाने म्हटले आहे.

मी जेव्हा सामाजिक बाबतीत मतप्रदर्शन केले तेव्हा माझी मते कुणीही गांभीर्याने घेतली नाहीत. आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही असेही मल्लिकाने म्हटले आहे. मी जेव्हा महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉलिवूडमधल्या काही जणांनी मला नावे ठेवली. एवढेच काय काही जणांनी तर मी देशभक्त नाही असेही म्हटले. मात्र माझे माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे. सध्याचा देशातला काळ हा अभिनेते, कलावंतांसाठी सुवर्णकाळ आहे तुम्ही तुमचे मत अगदी ठामपणे मांडू शकता ही खरोखर चांगली बाब आहे असेही मल्लिकाने म्हटले आहे.