नाशिकफाटा ते चाकण ‘हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो नियो मार्ग.

0
178

नागपूर, दि. २१ (पीसीबी) – नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रोऐवजी ‘हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो नियो मार्ग’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधिमंडळात स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, आसपासच्या ग्रामीण भागात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिक जटिल होऊ नये, म्हणून मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यानुसार महापालिका भवन ते निगडीपर्यंत, तसेच हिंजवडी ते चाकणपर्यंत मेट्रोचा मार्ग तयार करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. या दोन्ही मार्गांच्या मेट्रोला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हिंजवडी ते चाकण मार्गावरील नाशिक फाटा ते चाकणपर्यंत (२३ किलोमीटर) मेट्रोऐवजी ‘मेट्रो नियो मार्ग’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप आणि माधुरी मिसाळ यांनी विधिमंडळात विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विनंतीनुसार महामेट्रोने नाशिक फाटा ते चाकण या मार्गिकेसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यानंतर ही मार्गिका मेट्रो नियोमध्ये रुपांतरित करून आणि मार्ग कमी करून तो भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर ते चाकणपर्यंत करण्याची महापालिकेने महामेट्रोला विनंती केली होती. यामध्ये नाशिक फाटा ते भोसरी हा एचसीएमटीआर मेट्रो नियो आणि भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर ते चाकण हा मेट्रोऐवजी मेट्रो नियो असा बदल महापालिकेद्वारे सुचविण्यात आला होता. त्यानुसार महामेट्रोमार्फत भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर ते चाकण मेट्रो नियोचा डीपीआर तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.’

पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गिकेचा प्रस्ताव केंद्राकडे
पिंपरी-चिंचवड ते निगडी या विस्तारित मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. केंद्राने या प्रस्तावावर काही निरीक्षणे नोंदवून सुधारित डीपीआर सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल राज्य शासनाने चालू वर्षी २५ फेब्रुवारी रोजी केंद्राकडे पाठविला आहे. सद्य:स्थितीत हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात स्पष्ट केले.

मेट्रो नियो म्हणजे काय?
देशातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरात गर्दीच्या वेळी प्रतितास साधारणपणे पाच ते १५ हजार लोक प्रवास करतात. ही संख्या वाहून नेण्याची क्षमता असणारी ‘मेट्रो नियो’ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील उपाय आहे. डबे, सोयीसुविधा, स्थानक आणि इतर सर्वकाही मेट्रोसारखे असेल, केवळ नियोचे डबे मेट्रोप्रमाणे रुळांवर न चालता रबरी टायरवर चालणार आहेत. नियो विजेवर धावणारी, तरीही रबरी टायरची चाके असणारी आहे. एका डब्याची प्रवासी क्षमता १८० ते २५० असेल. नियो मेट्रो तीन डब्यांसह धावते. मेट्रोच्या खर्चापेक्षा नियोचा खर्च कमी असल्याने त्याला प्राधान्य दिले जाते.