नाना पाटेकर शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार ? | थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
520

डॉ. अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी अजितदादांची मोठी खेळी, दोन दिवसांत होणार अधिकृत घोषणा

प्रख्यात अभिनेते, प्रभावी वक्ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी केली आहे. अगदी काट्यानेच काटा काढायचा म्हणून कोल्हे यांच्या विरोधात जेष्ठ नाट्यचित्र अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुढे आले आहे. डॉ. कोल्हे यांच्या विरोधात महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते. भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासशेठ लांडे तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलिप मोहिते यांचीसुध्दा नावे चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून दोन दिवसांत त्याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजले.

शिरूर लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनांव तर खासदार डॉ. कोल्हे यांनी शरद पवार की अजित पवार या द्विधा मनस्थितीत अखेर साहेबांची पताका खआंद्यावर घेतली. त्यावेळी संतापलेल्या अजितदादांना आता खासदार कोल्हे यांना पाडणारच, असा जाहीरसभेत नारा दिला. तेव्हापासून कोल्हे यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार असणार याचीच मोठी चर्चा रंगली होती. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहे. तोडिस तोड म्हणून अजितदादा कोणाला उमेदवारी देणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

शिंदे गट शिवसेनेचे माजी खासदार आढाळराव पाटील यांनी दंड थोपटले आणि थेट प्रचाराला सुरवातसुध्दा केली. मतदारसंघातील सहा तालुके त्यांनी दोनवेळा पिंजून काढले. गावोगावचे जुनेच नेटवर्क त्यांनी पुन्हा कार्यरत केले. कोल्हे यांच्या विरोधात त्यांना लढायचे असेल तर ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अडचण होती. प्रसंगी आढाळराव हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि घड्याळ चिन्हावर लढतील अशा बातम्या सुरू झाल्या. दरम्यान, पुणे म्हाडाचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनीसुध्दा दोन दिवसांपूर्वी पदभार घेतला. ज्या अर्थी राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले पुणे म्हाडा अध्यक्षपद दिले त्याचाच दुसरा अर्थ त्यांचा खासदारकीचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरू झाली. स्वतः आढाळराव यांनी त्यावर पडदा टाकताना म्हाडा पद असले तरी मी लढणारच असे प्रारंभी सांगितले. नंतर त्यांचा सूर मवाळ झाला आणि जर का आमदार वळसे, आमदार लांडगे यांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेल, असे ते म्हणू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे आता विरोधक छातीठोकपणे सांगत आहेत.

भाजपने या जागेवर दावा केल्याच्या बातम्या होत्या, पण आमदार महेश लांडगे यांनी अलिप्त राहणे पसंत केले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाबाबत राजी नाहीत, असे समोर आले. अजितदादांचे कट्टर समर्थक भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गेले आठवडाभर चाचपणी सुरू केली आणि शिवजयंतीला शक्तीप्रदर्शन केले. आपल्याला संधी मिळाली तर लढणार, असे ते म्हणू लागले. प्रत्यक्षात अजित पवार हे त्यांच्या नावावर होकार द्यायला तयार नाहीत. सात वेळा आमदार आणि सलग २५ वर्षे मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील हे एक नाव वजनदार समजले जाते मात्र, प्रकृती साथ देत नसल्याने ते स्वतः तयार नाहीत. अशा परिस्थिती कोल्हे यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण याचे गूढ होते.

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचेही नावाबाबत भरपूर चर्चा झाली. पार्थ यांनी शिरूर मध्ये दोनदा छोटेसे दौरे केल्याने त्यांचा चाचपणी सुरू आहे, असे म्हटले गेले. प्रत्यक्षात पार्थ यांचा २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल अडिच लाखांनी पराभव स्विकारावा लागला होता आणि जर का ते शिरूरमध्ये उभे राहिले तर तब्बल तीन लाखांनी पडतील अशी विधाने सुरू झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांचे नाव त्यांच्या सख्या नणंदबाई आणि शरद पवार यांच्य कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निश्चित झाले. स्वतः सुनेत्राताई प्रचारालाही लागल्या आहेत. अशा परिस्थितीत पार्थला पुन्हा मावळ किंवा शिरूर अशा कोणत्याही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली तर त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसेल असे लक्षात आले. दादांच्या एकाच घरात दोन दोन उमेदवार म्हणून विरोधकांना आयतेच कोलित मिळेल म्हणून पार्थ यांचे नाव कायमचे मागे पडले.

कोल्हे यांच्या विरोधातील खूप मोठे नाव असेल अशी आठवडाभर चर्चा होती. आता नाना पाटेकर यांचे नाव अचानक समोर आल्याने रंगत वाढली आहे. स्वतः नाना पाटेकर त्यासाठी राजी आहेत की नाही ते समजलेले नाही. अजित पवार आणि त्यांचे अगदी अरे तुरे च्या शब्दांत संभाषण असल्याने खूप निकटचे संबंध आहेत. अजितदादांसाठी नाना पाटेकर ही जोखिम पत्करतील का तेच आता पहायचे आहे. उमेदवारीची घोषणा झालीच तर डॉ. कोल्हे यांच्या प्रभावी वकृत्वाला नाना पाटेकर यांचा मुंहतोड जबाब मिळणार आहे. पूर्वी डॉ. कोल्हे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या मालिकेचा प्रभाव लोकांवर पडला आणि सलग तीनवेळा लाखोंच्या फरकाने विजयी होणाऱ्या शिवाजीराव आढळराव यांचा ६० हजाराने पराभव झाला. आता तोच फॉर्मुला वापरून कोल्हे यांचा पाडाव करण्यासाठी तगडा अभिनेता आणि वक्ता म्हणून नाना पाटेकर यांचे नाव समोर आले आहे.

नाना पाटेकर हे मुंबई, पुणे सहर सोडून शिरूर लोकसभा लढतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. सहाही तालुक्यातील जनतेने मागे डॉ.कोल्हे यांचा राजकारणापेक्षा त्यांच्या अभिनयाकडे अधिक ओढा असल्याचे अनुवले आहे. पाच वर्षांत डॉ.कोल्हे हे मतदारांना वेळ देऊ शकले नाही, भेटले नाहीत अशी प्रमुख तक्रार त्यांच्याबाबत होती. आता मुंबईचे नाना पाटेकर आले तर ते निवडूण गेल्यावर पुन्हा इकडे फिरकतील का, असाही प्रश्न आहे. राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल नाना पाटेकर यांचे कटू भाष्य सर्वश्रुत आहे. अशात ते स्वतः राजकारणात उतरतील का याबाबतही साशंकता आहे. समजा नाना पाटेकर रिंगणात उतरले तर लोक स्थानिक म्हणून पुन्हा कोल्हे यांना पसंती देतील की अभिनंय सम्राट म्हणून नाना पाटेकर यांना निवडतील याबाबत आताच खमंग चर्चा सुरू झाली आहे. आता अजितदादा काय करतात कोणाला उमेदवारी देतात ते पहायचे.