नागपूरात लाच म्हणून मागीतल्या तीन वेश्या; दोन पोलिस निलंबीत

0
735

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि ३५ हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.४) नागपूरमधून उघडकीस आला होता. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा असे या आरोपी पोलिसांची नावे आहेत. त्या दोघांना अटक देखील करण्यात आली होती.

दोघेही पोलिस नागपूर पोलिसातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. त्यामुळे हे पथकच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या राजुरकर आणि मिश्रा या दोघांनी त्या महिलेला अटक करण्याऐवजी लाच म्हणून तीन वेश्या आणि ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. हे समजताच दोघा पोलिसांना अटक करण्यात आली तर नागपुरातील गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा पथकही बरखास्त करण्यात आले आहे.