नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; नागपुर खंडपीठात दोन याचिका दाखल

0
619

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – अमरावती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडून आलेल्या नवनीत कौर रवी राणा यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाल्या आहेत. “लुभाणा” जातीत जन्माला आलेल्या नवनीत रवी राणा यांनी “मोची” जातीचा बनावट दाखला सादर करुन राखीव मतदार संघातून निवडणूक लढवल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी निवडणूक याचिकेत करण्यात आली आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि स्थानिक मतदार सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररीत्या याचिका दाखल करत नवनीत रवी राणा यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. नवनीत रवी राणा यांनी निवडणूक लढवून मागासवर्गीयांचा संविधानिक आधिकार हिरावून घेतल्याचे या याचीकेत म्हटले आहे. तसेच, त्यात केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर पंजाब सरकारच्या महसुल सचिवांनी सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लुभाना जातीच्या कागद पत्रांचा हवाला देण्यात आला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहे. या राखीव जागेवर नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व जिंकली. त्या मुळच्या “लुभाणा” जातीच्या आहेत. मात्र त्यांनी मोची जात दाखल्याच्या आधारे राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवली.

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांच्या वडिलांचे मोची जातीचे जात प्रमाणपत्र मुंबई जातपडताळणी समितीने रद्द केले होते. तसेच ते जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते. तथापी नवनीत राणा यांनी नोकरीच्या कारणासाठी काढलेले “मोची” जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणुकीसाठी वापरले. मागासवर्गीयासाठी आरक्षित असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढून त्यांनी पात्र मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय केला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या वतीने अॅड. सचिन थोरात आणि सुनिल भालेराव यांच्या वतीने अॅड. राघव कवीमण्डन यांनी याचिका सादर केल्या आहेत.