नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर

0
513

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या बायोपिकवर आता काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींवरील बायोपिक म्हणजे हा थट्टेचा विषय अशी टीका त्यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर भाजपाच्या योजनांवर एखादा कॉमेडी शो सुरू केला तर तोसुद्धा खूप चालेल अशी उपरोधिक टीप्पणी त्यांनी केली.

भाजपाच्या अनेक योजना तोंडघशी पडल्या आहेत. त्या योजनांवर एखादा कॉमेडी शो आणावा लागेल. पंतप्रधान मोदींना देशातील प्रश्नांवर प्रतिक्रिया द्यायला वेळ नाही. कारण ते परदेशात जाऊन बसले. अशा पंतप्रधानांवर चित्रपट निर्मिती करणे म्हणजे हा थट्टेचा विषय आहे. या पंतप्रधानांनी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्यांची दिशाभूल केली आहे. ही गरिबीची आणि लोकशाहीची थट्टा आहे, असं त्या म्हणाल्या.

उत्तर मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ‘लोकशाहीत फक्त लोक स्टार असतात, त्यामुळे मी स्टार असून उपयोग नाही. लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. माझ्या विरोधात असलेली व्यक्ती कार्यसम्राट असेल तर मला नक्कीच भीती वाटायला पाहिजे. पण त्यांनी असं काही काम केलंच नाही. माझ्या मतदारसंघात मला कोणतीही कामं केलेली दिसली नाहीत आणि जी केली आहेत ती मध्येच कोलमडून पडली आहेत,’ असंदेखील त्या म्हणाल्या.