नमाजला विरोध करण्यासाठी भाजपचे भर रस्त्यात हनुमान चालीसा पठण

0
492

कोलकाता, दि. २६ (पीसीबी) – भाजपा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने ‘हावडा बाली खाल’ मार्गावर हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केल्याचा प्रकार मंगळवारी घडला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष ओमप्रकाश आणि प्रियांका शर्मा यांच्यावतीने ‘हावडा बाली खाल’ मार्गावर हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. दर शुक्रवारी नमाज पठणासाठी जी.टी. रोड बंद करण्यात येतो. त्यामुळे  रूग्णांचे प्राण जातात, नागरिकांना आपल्या ऑफिसलाही पोहोचण्यात उशीर होतो, असेही भाजयुमो हावडाकडून सांगण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या शासनात ग्रॅन्ड ट्रंक रोड आणि अन्य मुख्य रस्ते शुक्रवारी नमाज पठणासाठी बंद करण्यात येतात. त्यामुळे रूग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. तर अनेकांना आपल्या ऑफिसला पोहोचण्यातही उशीर होतो. जो पर्यंत रस्ता बंद करून नमाज पठण सुरू राहिल, तो पर्यंत दर मंगळवारी हनुमान मंदिरांच्या नजीकच्या प्रमुख रस्त्यांवर हनुमान चालीसा पठण करण्यात येईल, असा इशाराही एका भाजपाच्या नेत्याने दिला आहे. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना त्यांचे जय श्रीरामच्या घोषणेने स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी कमालीच्या तापल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता जय श्रीरामनंतर हनुमान चालीसाचा मुद्दा तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.