नद्यातील जलपर्णी काढण्याच्या कामाला तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा खर्च

0
315

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पावसाळा सुरू झाल्यावर जलपर्णी काढण्याचे नाटक नेहमीचेच असते. पाऊस आल्यावर नदीच्या पाण्यात जलपर्णी वाहून जाते आणि बिल वसूल केले जाते, हा अनुभव पर्यावरणवादी कार्यकर्ते कायम अनुभवतात. आता शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील संपूर्ण जलपर्णी काढण्यासाठी पाच टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पवना नदीतील जलपर्णी काढण्यासाठी तीन टप्पे तयार करण्यात आले आहेत. या तीनही नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी एकूण ३ कोटी ९६ लाख रूपये खर्च झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ किलो मीटर, इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलो मीटर आहे. शहराची दिवसेंदिवस होणारी वाढ आणि औद्योगिकीकरण यामुळे या नद्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यातच या नदीपात्रांमध्ये जलपर्णीही बेसुमार वाढल्या आहेत. या जलपर्णी काढून नदीपात्र नियमितपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी महापालिकेमार्फत पवना़, इंद्रायणी आणि मुळा या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविण्यात येतात. या तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी टर्न-की या तत्वावर शहरातील नद्यांचे पाच पॅकेजमध्ये विभागणी करून जलपर्णी काढण्याचे कामकाज प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामध्ये संपूर्ण इंद्रायणी नदीकरिता एक पॅकेज आणि पवना, मुळा नदीकरिता चार पॅकेज अशा प्रकारे एकूण पाच निविदा कामकाज सोपविण्याचे निश्चित करण्यात आल्या.

स्थायी समिती सभेच्या ७ एप्रिल २१ रोजीच्या ठरावानुसार या प्रत्येक पॅकेजकरिता २०० कामगार, दोन जेसीबी, चार पोकलॅण्ड यानुसार, निविदा मागविण्यात आल्या. हे कामकाज आदेशाच्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीकरिता काम सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी १६ एप्रिल २०२१ रोजीच्या प्रस्तावाद्वारे मान्यता दिली. त्यानुसार, पवना नदीतील जलपर्णी काढण्यासाठी पॅकेज एक करिता सांगवडे ते रावेत बंधारा आणि पॅकेज दोन अंतर्गत रावेत बंधारा ते मोरया गोसावी या दरम्यानचे काम शुभम उद्योग यांना देण्यात आले. या दोन्ही पॅकेजसाठी अनुक्रमे ८१ लाख ५८ हजार रूपये आणि ७३ लाख ६६ हजार रूपये खर्च झाला. पॅकेज चार अंतर्गत चिंचवडगाव ते टाटा ब्रीज या दरम्यानची जलपर्णी काढण्यासाठी ८१ लाख रूपयांचा खर्च झाला. हे काम बापदेव महाराज स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था यांना देण्यात आले.

मुळा नदीसाठी पॅकेज तीन अंतर्गत वाकड ते दापोडी संगम या दरम्यानची जलपर्णी काढण्यात आली. हे काम वैष्णवी एंटरप्रायजेस यांना देण्यात आले. त्यासाठी ८५ लाख ९९ हजार रूपये खर्च झाला. तर, पॅकेज पाच अंतर्गत इंद्रायणी नदीत मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते चNहोली या दरम्यानची जलपर्णी काढण्यात आली. हे काम सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला देण्यात आले. त्यासाठी ७३ लाख ९० हजार रूपये खर्च झाला. या तीनही नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ४५ दिवसांमध्ये ३ कोटी ९६ लाख रूपये खर्च झाला.

टाटा ब्रीज ते बोपखेलसाठी स्वतंत्र निविदा
पवना नदीतील टाटा ब्रीज ते बोपखेल या हद्दीतील जलपर्णी काढण्यासाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आली. ही जलपर्णी काढण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला. काम सुरू करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी १० मे २१ रोजीच्या प्रस्तावाद्वारे मान्यता दिली. त्यानुसार, तावरे फॅसिलीटी मॅनजमेंट सव्र्हीसेस यांना काम देण्यात आले. या कामासाठी २५ लाख २० हजार रूपये खर्च करण्यात आला.