पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधक झाले सत्ताधाऱ्यांना “मॅनेज”; राष्ट्रवादीची धार कमी झाली, शिवसेनेने नांगी टाकली!

0
5053

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधक सत्ताधाऱ्यांना “मॅनेज” झाले असून, गुरूवारी (दि. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची धार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. महापौर राहुल जाधव यांनी मारल्यासारखे करायचे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी रडल्यासारखे करायचे, असे चित्र होते. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील नांगी टाकल्याचे चित्र होते. महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांमधील ही “राजकीय सेटिंग” राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यामुळे साने यांनी सभागृहात एखाद्या विषयाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिवाळीनंतर सत्ताधाऱ्यांसोबत परदेश दौऱ्यात मौजमजा केली. हा दौराच आता सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे महापालिकेतील राजकीय चित्र आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भानगडी मॅनेज करून विरोधक गलेलठ्ठ झाल्यास शहरातील नागरिकांना आश्चर्य वाटायला नको.    

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तांतर घडले. राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्ता घालवून महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी अभ्यासू नगरसेवक योगेश बहल यांना विरोधी पक्षनेते केले. परंतु, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी बहल यांच्या विरोधात षड्यंत्र रचले. बहल हे सत्ताधाऱ्यांना विरोध करत नाहीत, असा कांगावा रचला. प्रत्यक्षात बहल यांनी केवळ प्रसिद्धीपत्रक काढून सतत चर्चेत न राहता सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामांना वेळोवेळी विरोध केला. त्यांचा हा विरोध कडवा होता. त्यामुळे सत्तेच्या पहिल्या वर्षात भाजपला घाम फोडण्यात राष्ट्रवादीला निश्चितच यश आले होते. दुसरीकडे बहल यांच्याविरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांना यश आले आणि बहल यांना विरोधी पक्षनेतपदावरून पायउतार व्हावे लागले.

अजितदादांनी योगेश बहल यांच्या जागेवर चिखलीचे नगरसेवक दत्ता साने यांची निवड केली. निवड होताच दत्ता साने यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार पत्रकबाजी सुरू केली. पत्रकबाजीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य किती याबाबत शंका उपस्थित व्हावी, अशी स्थिती आहे. तरीही साने यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. परंतु, आता महापालिकेत उलटे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना “मॅनेज” झाल्याचे चित्र आहे. गुरूवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेत विरोधकांची धार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. महापौर राहुल जाधव यांनी मारल्यासारखे करायचे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी रडल्यासारखे करायचे, असे चित्र होते. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी देखील नांगी टाकली होती. त्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गेल्या महिन्यात दिवाळीनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित युरोपचा दौरा केला. त्यामध्ये विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले देखील सामील झाले होते. हाच दौरा सत्ताधाऱ्यांसाठी फलदायी ठरल्याचे बोलले जात आहे. या परदेश दौऱ्यात सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे पूर्णपणे समाधान केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. महापौर राहुल जाधव आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे एकाच परिसरातील आहेत. त्यामुळे देखील साने यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील धार कमी केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दत्ता साने यांच्या या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकांची राजकीय गोची होण्याची शक्यता आहे. ती गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाली. त्यामुळे महापालिकेतील बदललेले हे राजकारण आगामी काळात कोणते वळण घेते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.