धुळ्यात भाजपला पुन्हा धक्का; अनिल गोटे करणार शिवसेनेचा प्रचार

0
1479

धुळे, दि. ४ (पीसीबी) – धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी शहरात ज्या ठिकाणी त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार नाहीत, त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. धुळे महापालिका निवडणुकीत गोटे यांनी सवतासुभा मांडत स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने आधीच भाजप अडचणीत आली आहे.

आमदार अनिल गोटे ५ ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोटेंनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. गोटे यांनी या निवडणुकीत ७४ पैकी ६२ ठिकाणी आपल्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार  उभे केले  आहेत. त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर  मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घालून राजीनामा मागे घेण्यास सांगितले होते. गोटे यांनी महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. मात्र, भाजपने अशाच लोकांना उमेदवारी दिल्याने गोटे दुखावले होते. त्यांनी भाजपपासून फारकत घेत लोकसंग्राम पक्षाच्या तिकीटावर उमेदवार उभे करून भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.